अवैध बांधकामे, कचरा पाहून महापालिका आयुक्तांचा संताप अनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 07:03 PM2019-12-11T19:03:39+5:302019-12-11T19:05:57+5:30
आरेफ कॉलनीत आयुक्तांची पाहणी
औरंगाबाद : महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी त्यांनी आपल्याच अधिकाऱ्याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावून आपल्या कामाची पद्धत सांगितली. आज दुसऱ्या दिवशी आयुक्त थेट आरेफ कॉलनी वॉर्डात सकाळी ८.३० वाजता दाखल झाले. अवैध बांधकामे, जिकडे-तिकडे कचरा पाहून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. अतिक्रमण विभागाचे एक पदनिर्देशित अधिकारी, वॉर्ड अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मंगळवारी सकाळी ८ वाजता आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय टाऊन हॉल येथील इमारतीजवळ दाखल झाले. कार उभी करून जॉगिंग ट्रॅकसुटवरच ते पायी आरेफ कॉलनी वॉर्डाकडे निघाले. सोबत मनपा अधिकाऱ्यांचा फौैजफाटाही होता. यामध्ये सहायक संचालक नगररचना आर. एस. महाजन, कर निर्धारक व संकलक अधिकारी करणकुमार चव्हाण, वॉर्ड अधिकारी संजय जक्कल, पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आय. बी. खाजा, घनकचरा विभागाचे नंदकिशोर भोंबे, नगररचना विभागाचे उपअभियंता संजय कोंबडे आदींचा समावेश होता. वॉर्डात पाय ठेवताच जिकडे-तिकडे कचरा, अवैैध बांधकामे आयुक्तांना दिसून आली. अनेक घरांमध्येच छोटेसे दुकानही थाटण्यात आल्याचे निदर्शनास आले. एका अवैैध बांधकामाच्या ठिकाणी त्यांनी बांधकाम परवानगी घेतली का? याची चौैकशी केली. मालमत्ताधारकाने कोणतीच बांधकाम परवानगी घेतली नव्हती. मालमत्ताधारक दुसऱ्या मजल्याचे काम करीत होता. जुन्या घराला किमान कर तरी लावलेला आहे का? याची शहानिशा केली.
मनपाने करही लावला नसल्याचे आयुक्तांना कळाले. अतिक्रमण हटाव विभागाचे पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे यांना या सर्व प्रकाराबद्दल निलंबित करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर रस्त्यावरून जाताना जागोजागी कचऱ्याचे ढीग पाहताच या भागात स्वच्छता होत नाही का? प्लास्टिकचा सर्रासपणे वापर होत आहे. कचरा उचलून स्वच्छता करावी, कचरा टाकण्यासाठी डस्टबीन ठेवाव्यात, नागरिकांकडून डस्टबीनमध्ये कचरा टाकला जात नसेल तर त्यांना जागेवर दंड करावा, अशी सूचना केली. कचरा प्रश्नावर वॉर्ड अधिकारी जक्कल यांनाही निलंबनाचा इशारा दिला. मालमत्ता कर लावण्याची जबाबदारीही वॉर्ड अधिकाऱ्यांचीच आहे.
खाम नदी स्वच्छ करा
आरेफ कॉलनीशेजारी असलेल्या खाम नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करून बांधकामे झाल्याचे पाहून आयुक्त अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. नदीपात्रात अतिक्रमण होताना कारवाई करता आली नाही का? असा प्रश्न उपस्थित करताच अधिकारी निरुत्तर झाले. नदीपात्रातील कचरा तातडीने उचलून नदीपात्र स्वच्छ करा, त्याकरिता जेसीबी न घेता दोन ते तीन कर्मचारी लावा, अशी सूचना केली. सायंकाळपर्यंत नदीपात्रातील एकाच भागात तीसुद्धा दर्शनी भागात स्वच्छता करण्यात आली.
कचरा वेचक, भंगारवाल्यांचे सहकार्य घ्या
शहरात कचरा वेचक आणि भंगारवाले कचरा उचलण्यासाठी मदतगार ठरणारे आहेत. कचरा वेचकांच्या मदतीने कचऱ्याचे वर्गीकरण करता येते. तसेच भंगारवालेदेखील मदत करतात. त्यांच्यावर कारवाई न करता उलट त्यांना सहकार्य करा, अशी सूचना आयुक्तांनी केली.
आजपासून आयुक्त दुचाकीवर
बुधवारपासून आयुक्त पाण्डेय दुचाकीवर वॉर्डात फिरणार आहेत. वॉर्ड अधिकारी, नगररचना अधिकारी, इमारत निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, मालमत्ता अधिकारी, पाणीपुरवठा अभियंता, वॉर्ड अभियंता यांनी सोबत राहावे, अशी सूचना केली.