शहरात १५ शौैचालयांसाठी मनपाची कवायत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 10:19 PM2018-12-08T22:19:18+5:302018-12-08T22:19:58+5:30
पहिल्या टप्प्यात १५ ठिकाणी शौचालये उभारण्यात येणार आहेत. एका शौचालयासाठी किमान २५ लाख रुपये खर्च येत आहे. सीएसआर निधीतून ही कामे करता येऊ शकतात का? यादृष्टीने मनपा प्रशासन आणि खाजगी संस्था चाचपणी करीत आहे.
सीएसआर निधीचा शोध : एका शौचालयाचा बांधकाम खर्च २५ लाख
औरंगाबाद : शहरात किमान १०० सुलभ शौचालये उभारण्याचा मानस मनपा प्रशासनाने व्यक्त केला आहे. सुलभ इंटरनॅशनल या खाजगी संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात १५ ठिकाणी शौचालये उभारण्यात येणार आहेत. एका शौचालयासाठी किमान २५ लाख रुपये खर्च येत आहे. सीएसआर निधीतून ही कामे करता येऊ शकतात का? यादृष्टीने मनपा प्रशासन आणि खाजगी संस्था चाचपणी करीत आहे. निधीची व्यवस्था होताच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
इंदूर शहरात १५० पेक्षा अधिक शौचालये आहेत. इंदूरची लोकसंख्या ३२ लाख आहे. घनकचऱ्यात मनपाने इंदूर पॅटर्न अवलंबिला आहे. आता शौचालयांसाठीही हाच पॅटर्न राबविण्यात येत आहे. महापालिकेकडे निधी नाही. त्यामुळे सीएसआर फंडातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महापालिकेला यापूर्वी विविध कंपन्या, संस्थांनी भरीव आर्थिक मदत केली आहे. चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाने शाळांमध्ये शौचालये बांधावीत म्हणून ८५ लाख रुपये दिले होते. महापालिकेने आजपर्यंत शौचालये बांधली नाहीत.
त्यामुळे खाजगी संस्था मनपावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. अशा विपरीत परिस्थितीतही सीएसआर निधीचा शोध सुरू केला आहे. शहरात एकूण १५ ठिकाणी पहिल्या टप्प्यात शौचालये उभारण्यात येतील. पे अँड युज या तत्त्वावर ही शौचालये राहणार आहेत. जिथे शौचालयाचे बांधकाम सुरू करायचे आहे, त्या सर्व मनपाच्या मालकीच्या जागा आहेत. नगररचना विभागाकडे जागेच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सोमवारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आठ दिवस सीएसआर निधीचा शोध घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले.