रंगमंदिराच्या देखभाल-दुरुस्तीसाठी महानगरपालिकेकडे पैसे नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 06:52 PM2019-07-10T18:52:48+5:302019-07-10T18:54:51+5:30
शहरातील कला-संस्कृतीचा खेळखंडोबा
औरंगाबाद : संत एकनाथ रंगमंदिराच्या नूतनीकरणाचा घाट तर औरंगाबाद महापालिकेने मोठ्या उत्साहात घातला; पण जसजशी कामाला सुरुवात झाली, तसतसे कामाचे बजेट ‘वाढता वाढता वाढे’ या उक्तीप्रमाणे वाढत गेले. आता तर वाढलेला खर्च आणि बजेट यांचा काही ताळमेळच राहिला नसून पालिकेने चक्क पैसे नाहीत म्हणून हात वर केले असून, रंगमंदिराचे काम मागील कित्येक दिवसांपासून ठप्प आहे.
कला-संस्कृतीचा हा खेळखंडोबा नाट्यरसिकांना व्यथित करणारा असून, पैसे आले की काम करू, असे थंड धोरण महापालिकेने स्वीकारलेले आहे. काम सुरू केले तेव्हा रंगमंदिराच्या कामकाजासाठी येणारा अंदाजित खर्च ५ ते ६ कोटी असणार होता; पण आता हा खर्च ९ कोटींपेक्षाही अधिक लागणार असल्याचे सांगितले जाते. रंगमंदिराच्या या भिजत घोंगड्याविषयी ‘लोकमत’ने दि. २९ आॅक्टोबर २०१८ रोजी परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती राजू वैद्य यांनी जून-२०१९ ला काम पूर्ण होईल, असे सांगितले होते. मनपा अधिकाऱ्यांकडूनही याला दुजोरा देण्यात आला होता; पण प्रत्यक्षात मात्र पैशाअभावी सर्वच व्यवहार ठप्प आहेत. आता मनपाकडे पैसा येईपर्यंत वाट पाहत बसण्याची वेळ रंगकर्मी आणि सामान्य रसिकांवर आली आहे. पालिकेच्या या थंडगार धोरणाचा मोठा फटका नाट्य व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांना बसला असून, यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक कुचंबणेला तोंड द्यावे लागत आहे.
रंगमंदिराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही रंगमंदिरासाठी केवळ अर्ज-विनंत्या करू शकतो; पण रंगमंदिरासाठी पैसा पुरविणे हे पूर्णपणे प्रशासनाचे काम आहे. सद्य:स्थिती पाहता रंगमंदिराच्या कामाला मनपा आयुक्तांचे प्रथम प्राधान्य आहे, असे दुर्दैवाने दिसत नाही. त्यांचे या कामी दुर्लक्ष होत असून त्यांनी लवकरात लवकर रंगमंदिराचे काम पूर्ण करावे, अशी त्यांना विनंती केली आहे. पालकमंत्री रामदास कदम यांनी रंगमंदिराच्या कामासाठी दोन क ोटी रुपये दिले होते; पण आता वातानुकूलित यंत्रणा बसवायचे ठरल्यामुळे बजेट वाढले. रंगमंदिराच्या कामासाठी शासनाकडून काही मदत मिळू शकेल का, यासाठी आता आमचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या बैठकीत आम्ही पालकमंत्र्यांपुढे पुन्हा हा प्रश्न मांडू, असे राजू वैद्य म्हणाले.
वसुली कमी आणि खर्च जास्त
एसीचे आणि सिलिंगचे काम चालू होते; पण एसीच्या कामासाठी पैसे दिलेले नसल्यामुळे कंत्राटदाराने काम बंद केले आहे. एसी व सिलिंगनंतर खुर्च्या आणि स्टेज असे काम करण्यात येईल. मनपा आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वीच बैठक घेतली होती. रंगमंदिराच्या कामासाठी पैसे द्यावेत, असे त्यांनी संबंधितांना सांगितले आहे. वसुली कमी आणि खर्च जास्त यामुळे काम बंद आहे. शिवाय हे काम मनपा फंडातून करायचे आहे, त्यामुळे ते सर्वस्वी वसुलीवरच अवलंबून आहे. पैसे आले की, ३ महिन्यांत काम पूर्ण होईल.
- बी. के. परदेशी, उपअभियंता, महापालिका