महापालिकेत अधिकाऱ्यांचे प्रशासनाकडून खच्चीकरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 07:01 PM2019-04-01T19:01:14+5:302019-04-01T19:07:31+5:30
प्रशासनाच्या या खच्चीकरण धोरणाबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये संताप आहे.
औरंगाबाद : महापालिकेतील २५ ते ३० वर्षांपासून वरिष्ठ पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे विभाग प्रमुख राज्य शासनाकडून आलेल्या कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. मागील १५ दिवसांपासून कनिष्ठ अधिकारी अधिकार गाजवत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेशावर आदेश देत आहेत. प्रशासनाच्या या खच्चीकरण धोरणाबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये संताप आहे.
वॉर्ड अधिकारी दर्जाचे पंकज पाटील, करणकुमार चव्हाण, विजया घाडगे हे तीन अधिकारी महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आले. ४ हजार ४०० असा या अधिकाऱ्यांचा ग्रेड पे आहे. प्रशासनाने त्यांना वॉर्ड अधिकारी ऐवजी सहायक आयुक्त म्हणून नेमणूक दिली. पाटील यांना मालमत्ता अधिकारी म्हणून पदस्थापना दिली. याशिवाय त्यांना उद्यान विभाग, पशुसंवर्धन विभाग, स्पर्धा परीक्षा केंद्राचे विभाग प्रमुख केले. चव्हाण यांना ई-गव्हर्नन्स, जनसंपर्क, क्रीडा विभागात पदस्थापना दिली. ड्रेनेज आणि पाणीपुरवठा विभागाची अतिरिक्त जबाबदारी सोपविली आहे. घाडगे यांची पदस्थापना महिला व बालविकास अधिकारी म्हणून केली. त्यांच्याकडे दिव्यांग, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालये, पंतप्रधान आवास योजना, पथदिवे आदी विभाग सोपविले आहेत.
प्रशासनाने ज्या विभागांची ओएसडी म्हणून या नवीन अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे, त्यांनी प्रत्यक्षात कामही सुरू केले. संबंधित विभागात अगोदरच विभाग प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता दर्जाचे अधिकारी कार्यरत आहेत. नवीन अधिकारी पाणीपुरवठा, ड्रेनेज आदी विभागांतील जुन्या विभाग प्रमुखांना घटनास्थळी जाऊन पाहणी करा, त्वरित मला रिपोर्ट करा, असे आदेश देत आहेत. यामुळे काहींनी तर स्वेच्छानिवृत्तीचा विचारही सुरू केला आहे. अलीकडेच एका उपअभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याने स्वेच्छानिवृत्तीही घेतली आहे. महापालिकेतील बहुतांश अधिकारी आता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. कोणाचे दोन, तर कोणाचे एक वर्ष निवृत्तीस बाकी आहे. कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखाली आम्ही अजिबात काम करू शकत नाही, असा सूर बहुतांश अधिकाऱ्यांचा आहे.