शहर खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिका सरसावली; पॅचवर्कसाठी ३० नोव्हेंबरची डेडलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 02:06 PM2017-11-08T14:06:51+5:302017-11-08T14:07:36+5:30
पॅचवर्कच्या कामात गुणवत्ता नसल्यास दोषी कंत्राटदारासह अधिकाºयांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत शहर खड्डेमुक्त करा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले.
औरंगाबाद : शहर खड्डेमुक्त व्हावे यासाठी महापालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. शहरातील वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये पॅचवर्कचे कामही सुरू करण्यात आले असून, काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या. पॅचवर्कच्या कामात गुणवत्ता नसल्यास दोषी कंत्राटदारासह अधिकाºयांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत शहर खड्डेमुक्त करा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले.
सोमवारी आणि मंगळवारीही महापौरांनी वेगवेगळ्या विभागांचा आढावा घेतला. यावेळी रस्त्यांच्या नवीन कामांचा दर्जा राखलाच गेला पाहिजे. त्यात किंचितही उलटसुलट झाल्याचे निदर्शनास आल्यास संबधिताची गय करण्यात येणार नाही. आमखास मैदानावर मागील दोन दिवसांपासून मनपातर्फे पॅचवर्कचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कामासाठी जेवढी मोठी खडी वापरण्यात येते, त्या आकाराची खडी वापरली जात असल्याने आज केलेले पॅचवर्क उद्या खराब होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने मंगळवारी छायाचित्रासह सविस्तर वृत्तही प्रकाशित केले. याची दखल घेऊन महापौरांनी शहर अभियंता एस.डी. पानझडे यांच्याकडे बोगस पॅचवर्कच्या कामाची चौकशी सोपविली.
शहरातील नागरिक खड्ड्यांमुळे खरोखरच खूप त्रस्त आहेत. ज्या भागात गेले त्या भागातील नागरिक खराब रस्ते आणि खड्डे या मुद्यावर बोलतात, असे महापौरांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीने कचरा उचलण्याच्या प्रक्रियेत सकारात्मक बदल दिसून येत आहे, तसाच बदल रस्त्यांच्या बाबतीत दिसून येईल. अनेक वर्षांच्या सवयी आणि पद्धती बदलणे थोडे त्रासदायक आहे. मनपा प्रशासन सकारात्मक विचार करून सध्या काम करीत आहे. येणा-या ३० नोव्हेंबरपर्यंत शहरातील ९ वॉर्ड कार्यालयांमधील पॅचवर्कची कामे संपवा, असे आदेश दिले आहेत असेही महापौरांनी सांगितले.
दुभाजकही दुरुस्त करणार
शहरातील दुभाजकांकडे आजपर्यंत कोणीच लक्ष दिले नाही. दुभाजक दुरुस्तीकडेही लक्ष देण्यात आले आहे. लवकरच दुभाजकांची रंगरंगोटी, साफसफाई करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी दानशूर मंडळी पुढे येतात का, यादृष्टीनेही मनपाचा शोध सुरू असल्याचे महापौरांनी नमूद केले.