भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नियंत्रणात महापालिका
By Admin | Published: June 30, 2017 12:09 AM2017-06-30T00:09:51+5:302017-06-30T00:18:03+5:30
औरंगाबाद : भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या नियंत्रणात महापालिकेसह शहरातील राजकारण येऊ लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या नियंत्रणात महापालिकेसह शहरातील राजकारण येऊ लागले आहे. त्यांनी महापालिकेसह शहरातील राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली असून, भविष्यात शासनाकडून शहरासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान गरजेनुसार मिळविण्याची ग्वाही त्यांनी लोकमतशी बोलताना दिली.
महिन्यातून दोन वेळेस भाजप नगरसेवकांची बैठक यापुढे महापौर बंगल्यात घेण्याचे आदेश त्यांनी पदाधिकारी आणि महापौर भगवान घडामोडे यांना दिले. या बैठकीतून शहराची गरज आणि वॉर्डनिहाय विकासकामांसह लागणाऱ्या निधीसाठी नियोजन करण्याबाबत निर्णय होतील. खा. दानवे यांनी बुधवारी नगरसेवकांची बैठक घेऊन आगामी राजकीय अजेंड्याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले.
खा. दानवे यांनी सांगितले, ५ जानेवारी २०१७ रोजी शहरातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यानुसार अनुदान मिळावे, यासाठी पाठपुरावा केला. तीन महिन्यांच्या टप्प्यांत १०० कोटी रुपये मिळतील.
डीपी रोड करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निधी देण्याची घोषणा केली होती; परंतु नगरसेवकांनी वॉर्डनिहाय रस्त्यांसाठी निधी वापरावा, अशी मागणी केली आहे. त्यावर खा. दानवे म्हणाले, नगरसेवकांच्या मागणीचा विचार होईल; परंतु सुरुवातीला डीपी रोड करण्यासाठी नियोजन आहे. येत्या काही महिन्यांत रस्त्यांची निवड व डीपीआर तयार केले जातील. महापौरांनी पालिका प्रशासनासोबत चर्चा करून रस्त्यांचे अंदाजपत्रक तातडीने करावे.
आपल्या लोकसभा मतदारसंघात पालिकेचे वॉर्ड आहेत. त्यामुळे आपण शहराचे लोकप्रतिनिधी आहात. त्यावर खा. दानवे म्हणाले, १० वॉर्ड माझ्या मतदारसंघात येतात. त्यात किती डीपी रोड आहेत. त्याचा आढावा घेण्यात येईल.