महापालिका बदलणार ५० जातीवाचक वसाहतींची नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:04 AM2021-09-26T04:04:11+5:302021-09-26T04:04:11+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने जातीवाचक नावाचे गाव, शहरे, वस्ती आणि रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय अलीकडेच घेतला. यानुसार निर्णयाची अंमलबजावणी ...
औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने जातीवाचक नावाचे गाव, शहरे, वस्ती आणि रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय अलीकडेच घेतला. यानुसार निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मनपा प्रशासनाने शहरातील ५० जातीवाचक वसाहतींच्या नावांची प्राथमिक यादी तयार केली. संबंधित वसाहतीमधील नागरिकांकडून नवीन नावे मागविण्यात येतील. त्यानंतर वसाहतींची नावे बदलण्याचा निर्णय होणार असल्याचे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.
जातीवाचक नावामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. औरंगाबाद शहरात मागील अनेक वर्षांमध्ये या मुद्यावरून कधीच तेढ निर्माण झाला नाही. मात्र, शासन निर्णयानुसार महापालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली. प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वसाहती, रस्त्यांची नावे शोधण्यास सुरुवात करण्यात आली. याबाबत उपायुक्त थेटे यांनी नमूद केले की, जातीवाचक वसाहती, रस्त्याची नावे शोधण्यासाठी वॉर्ड अधिकाऱ्यांना कळविण्यात आले होते. त्यानुसार माहिती प्राप्त झाली. आता त्या भागातील नागरिकांकडून नवीन नावे मागवली जाणार आहेत. ही नावे प्राप्त झाल्यानंतर जाहीर प्रगटन देऊन प्रसिद्ध केले जाईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होईल.
मनपाकडे प्राप्त झालेली नावे
वॉर्ड क्र. १- डिंबर गल्ली, ब्राह्मण गल्ली, कुंभार गल्ली, मल्लावपुरा, बेगमपुरा, भिल्ल गल्ली, भीमनगर, भंगीवाडा, मांगवाडा (भावसिंगपुरा गाव), चांभारवाडा (भीमनगर, भावसिंगपुरा गाव), बौद्धवाडा, मोमीनपुरा, लोटाकारंजा, माळीवाडा (बारुदगर नाला).
वॉर्ड क्र. २- चेलीपुऱ्यातील धोबीघाट (काचीवाडा), नवाबपुरा येथील तेलंगवाडा गवळीपुरा, राजाबाजारमधील बोहरी कठडा, गुलमंडीमधील जोहरीवाडा, कुंभारवाडा, रंगारगल्ली, नागेश्वरवाडीतील पारधीपुरा, औरंगपुरा येथील बौद्धवाडा (पैठणगेट), सिल्लेखान्यातील कैकाडीवाडा, समर्थनगरातील भोईवाडा.
वॉर्ड क्र. ४- मयूरपार्कमधील गोंधळवाडा, हर्सूल प्रभागातील धनगर गल्ली, सोनार गल्ली, ब्राह्मण गल्ली, मांगवाडा, कैकाडी गल्ली, चांभार गल्ली, एकतानगरातील चांभार गल्ली, कोळीवाडा, सोनार गल्ली.
वॉर्ड क्र. ५- नारेगावातील भाटनगर, पटेलनगर, चौधरी कॉलनीतील शहानगर, पटेलनगर.
वॉर्ड क्र. ६- चिकलठाण्याच्या कामगार कॉलनीतील खाटीक गल्ली (कुरेशी गल्ली) धनगरवाडा, साठेनगर (मांगवाडा), बौद्धवाडा, सुतार वाडा, माळी गल्ली, कुंभारवाडा, तेलीगल्ली, मुल्लागल्ली, ब्राह्मण गल्ली, चांभारवाडा.
वॉर्ड क्र. ७- बौद्धवाडा (गोधडीपुरा), भारतनगरातील वैदुवाडा (वैदू मंदिर).
वॉर्ड क्र. ९- बौद्धनगर.