घाटी रुग्णालयाचा ताण मनपा हलका करणार; हडको एन-११ येथील रुग्णालयाचे काम पूर्णत्वाकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 06:45 PM2024-10-05T18:45:47+5:302024-10-05T19:49:36+5:30
मागील अनेक वर्षांपासून घाटीवरील ताण हलका करण्यासाठी निव्वळ चर्चा होते. आता मनपा सकारात्मक पाऊल उचलत आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहरात महापालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. त्यामुळे घाटी रुग्णालयावर रुग्णसेवेचा ताण वाढत चालला आहे. घाटी प्रशासनाची क्षमता नसतानाही रुग्णसेवा दिली जाते. घाटीवरील हा ताण हलका करण्यासाठी मनपा पुढाकार घेणार आहे. अधिष्ठातांसोबत चर्चा करून मनपा शहरात काही रुग्णालये सुरू करणार आहे. हडको एन-११ येथे स्मार्ट सिटीमार्फत मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
घाटी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज १८०० रुग्ण येतात. विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी १५०० रुग्ण दाखल असतात. घाटीला ११७७ बेडची मंजुरी आहे. अनेक रुग्णांना जमिनीवर गाद्या टाकून उपचार घ्यावे लागतात. सर्वाधिक रुग्ण प्रसूतीसाठी येतात. ग्रामीण आणि शहरी भागातील तब्बल ७० ते ८० महिलांची प्रसूती दररोज याठिकाणी होते. मागील अनेक वर्षांपासून घाटीवरील ताण हलका करण्यासाठी निव्वळ चर्चा होते. आता मनपा सकारात्मक पाऊल उचलत आहे. स्मार्ट सिटीच्या निधीतून एन-११ येथे सुसज्ज मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासाठी इमारत उभारण्यात आली. १० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या तीन मजली इमारतीत ६२ बेडची व्यवस्था आहे. शस्त्रक्रियागार, जनरल वॉर्ड, आयसीयू, सीटी स्कॅन विभाग, सोनोग्राफी विभाग, ४ खासगी रूम, अपघात कक्ष, पार्किंग अशा सोयीसुविधा आहेत.
३ ऑक्टोबरला होणार बैठक
रुग्णालय महापालिका प्रशासनच चालवणार आहे. त्यासाठी घाटी रुग्णालयाची मदतही घेतली जाणार आहे. ३ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात मनपात बैठकही आयोजित केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत कोणते उपचार या रुग्णालयात सुरू करावेत, यावर प्रामुख्याने चर्चा होईल. किती कोटींची यंत्रसामग्री खरेदी होईल, तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी कशा पद्धतीने उपलब्ध करून देणार, आदी मुद्यांवर चर्चा अपेक्षित आहे.
अधिष्ठाता यांच्यासोबत चर्चा
घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्यासोबत लवकरच चर्चा करण्यात येईल. घाटीवरील ताण हलका करण्यासाठी त्यांची मदत घेतली जाईल. त्यानंतर मनपा रुग्णसेवेचा विचार करणार आहे.
- जी. श्रीकांत, प्रशासक, मनपा