‘एमपीएससी’मार्फत मनपा ८ पदे भरणार; वर्ग ३ मधील पदांसाठी जाहीरात काढणार
By मुजीब देवणीकर | Published: May 23, 2023 07:01 PM2023-05-23T19:01:10+5:302023-05-23T19:01:20+5:30
महापालिकेत मंजूर पदांची संख्या ५,२०२ एवढी झाली, त्यापैकी २,९६५ इतकेच कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. २२३७ पदे रिक्त आहेत.
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील रिक्त पदांमुळे प्रशासनाला कामकाज करणे कठीण होत आहे. एका अधिकाऱ्याकडे किमान चार ते पाच विभागांचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. वर्ग-१ आणि वर्ग-२ मधील ८ महत्वाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वर्ग- ३ मधील ११५ पदांच्या भरतीसाठी जाहिरातीचा मसूदा अंतीम करून प्रशासकांच्या स्वाक्षरीने भरती प्रक्रिया राबविणाऱ्या आयबीपीएस कंपनीला पाठविण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिकेत मंजूर पदांची संख्या ५,२०२ एवढी झाली, त्यापैकी २,९६५ इतकेच कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. २२३७ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर गरजेनुसार म्हणजेच १२५ पदे भरण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला काही महिन्यांपूर्वी परवानगी दिली आहे. त्यासाठी आस्थापना खर्चाच्या मर्यादेला सूट देण्यात आली. प्रशासनाने वर्ग १ ते ३ मधील निवडक पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली. वर्ग-१ आणि वर्ग-२ मधील ८ रिक्तपदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र पाठवून पुढील प्रक्रिया करण्याची विनंती केली जाणार आहे. त्यांनी मान्यता दिल्यास एमपीएससी मार्फत आठ पदे भरली जातील. एमपीएससीने पदे भरण्यास असमर्थता दर्शविल्यास महापालिकेला ही पदे भरण्यासंदर्भात निर्णय घ्यावा लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्य शासनाने नोकर भरती संदर्भात नियुक्त केलेल्या एजन्सीपैकी आयबीपीएस या संस्थेची महापालिकेने निवड केली आहे. जाहिरातीचा मसुदा अंतीम करून पाठविण्याचे आयबीपीएस कंपनीने महापालिकेला कळविले होते. त्यानुसार जाहिरातीच्या मसुद्यावर आयुक्त जी. श्रीकांत यांनी स्वाक्षरी केल्यानंतर सोमवारी हा मसूदा आयबीपीएस कंपनीला पाठविण्यात आला आहे. आयबीपीएस कंपनीने मान्यता देताच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच आयबीपीएस कंपनीसोबत सामंजस्य करार (एमओयू) देखील केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.