महापालिका एमजीएमला देणार ५ व्हेंटिलेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:03 AM2021-04-21T04:03:57+5:302021-04-21T04:03:57+5:30
औरंगाबाद : मागील दोन दिवसांपासून शहरात शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही. गंभीर रुग्णांना चार ते ...
औरंगाबाद : मागील दोन दिवसांपासून शहरात शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही. गंभीर रुग्णांना चार ते आठ तासापर्यंत अत्यंत हाय ऑक्सिजनवर ठेवण्यात येत आहे. या गंभीर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी मंगळवारी महापालिकेने तातडीने ५ व्हेंटिलेटर एमजीएम रुग्णालयाला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. रुग्णांचा जीव वाचावा हाच यामागचा एकमेव उद्देश असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
शहरात ऑक्सिजन आणि आयसोलेशनसाठी सहज बेड मिळत आहेत. मात्र तुटवडा व्हेंटिलेटरचा आहे. खासगी कंपन्यांनी सीएसआर निधीतून घाटी रुग्णालयाला काही व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले. मागील एक वर्षापासून व्हेंटिलेटरची संख्या वाढवा असे वारंवार आदेश विभागीय आयुक्तांकडून देण्यात आले. मात्र या आदेशाचा आरोग्य यंत्रणेने गांभीर्याने विचार केला नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील वर्षीपेक्षा दहापट अधिक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. घाटी रुग्णालय आणि शहरातील खासगी रुग्णालयांमधील सर्व व्हेंटिलेटरवर रुग्ण आहेत. काही रुग्ण व्हेंटिलेटरसाठी वेटिंगवर आहेत. या गंभीर परिस्थितीत रुग्णांचा जीव वाचावा म्हणून मंगळवारी तातडीने प्रशासक आस्तिक कुमार पांण्डेय यांनी पालिकेकडील ५ व्हेंटिलेटर एमजीएम रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला. महापालिकेकडे व्हेंटिलेटर चालविण्यासाठी तज्ञ डॉक्टर नाहीत. खासगी रुग्णालयाला देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरवर शुल्क आकारणी किंवा आणखी काय निर्णय घ्यायचा हे नंतर निश्चित करण्यात येईल. शहरातील मोठ्या रुग्णालयांसाठी आणखी काही व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ शकतात का यादृष्टीने मनपा प्रशासन प्रयत्न करीत आहे.