महानगरपालिका शहागंजमधील ४० टपऱ्या काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 06:25 PM2019-06-19T18:25:16+5:302019-06-19T18:27:35+5:30
सेनेने कायद्याच्या चौकटीत एमआयएमची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद : शहागंज चमन येथे वल्लभभाई पटेल यांचा नवीन पुतळा उभारण्यात आला आहे. या भागात सुशोभीकरणाचे काम मनपाने हाती घेतले आहे. चमनच्या तिन्ही बाजूंनी व्यापाऱ्यांनी टपऱ्या थाटल्या आहेत. त्यामुळे पुतळा अजिबात दिसत नाही.
नगर परिषदेच्या काळात परवानगी दिलेल्या सर्व ४० टपरीधारकांची लीज संपली आहे. पुन्हा नव्याने लीज वाढवून देण्याचा विचार नाही. सर्व टपऱ्या काढून पटेल यांचा पुतळा नागरिकांना दिसेल, अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आज महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.
मागील वर्षी शहागंज चमन येथील टपऱ्यांच्या मुद्यावरून दंगल भडकली होती. दंगलीत १३ पेक्षा अधिक टपऱ्यांना टार्गेट करण्यात आले होते. महापालिकेने मागील वर्षीही सर्व टपऱ्या काढून घेण्याची भूमिका घेतली होती. टपऱ्या रिकाम्या करून त्या काढण्यासाठी अतिक्रमण हटाव पथकही तैनात करण्यात आले होते. ऐनवेळी एमआयएम नगरसेवकांनी गोंधळ घालत मनपाच्या पथकाला पिटाळून लावले होते. मागील चार दिवसांपासून महापालिकेत शिवेसना विरुद्ध एमआयएम असा सामना रंगला आहे.
सोमवारी एमआयएम नगरसेवकांनी महापौरांच्या विरोधात धरणे आंदोलन केले. त्यामुळे आज महापौरांनी शहागंज चमन येथे पटेल यांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. सोबत चंद्रकांत खैरेही उपस्थित होते. पाहणी दौऱ्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना महापौरांनी चमनमधील ४० अनधिकृत टपऱ्या लवकरच पोलीस बंदोबस्तात काढण्यात येतील. वल्लभभाई पटेल हे राष्ट्रपुरुष होते. त्यांची प्रतिमा औरंगाबादकरांना ठळकपणे दिसावी हा त्यामागचा हेतू आहे. कोणाला बेरोजगार करणे हा आमचा हेतू नाही. चमन परिसर सुशोभीत दिसावा, शहराच्या वैभवात थोडीशी भर पडावी यादृष्टीने लाखो रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात येत आहे.
एमआयएमची कोंडी
शहागंज चमन येथील व्यापाऱ्यांना पाठिंबा दर्शवून एमआयएमने मागील वर्षी राजकारण केल्याचे सर्वश्रुत होते. हाच धागा पकडत आता सेनेने कायद्याच्या चौकटीत एमआयएमची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी चमनमधील व्यापारी न्यायालयात गेले होते. न्यायालयाने त्यांच्याकडून भाडे घ्यावे, असे मनपाला आदेशित केले होते. मनपानेही एकाच वर्षाचे भाडे भरून घेतले होते. आता व्यापाऱ्यांकडे कोणतीच लीज, भाडेकरार नाही. त्यामुळे जागा रिकामी करण्यात येणार आहे.