१५० ओपन स्पेस अतिक्रमणमुक्त होणार; मोबाइलमधून मुलांना मैदानावर आणण्याचा पालिकेचा प्रयत्न

By मुजीब देवणीकर | Published: June 15, 2023 04:06 PM2023-06-15T16:06:35+5:302023-06-15T16:07:01+5:30

छत्रपती संभाजीनगरातील १५० ओपन स्पेसवरील अतिक्रमणे महापालिका हटविणार

Municipal Corporation will remove encroachments on 150 open spaces in Chhatrapati Sambhaji Nagar | १५० ओपन स्पेस अतिक्रमणमुक्त होणार; मोबाइलमधून मुलांना मैदानावर आणण्याचा पालिकेचा प्रयत्न

१५० ओपन स्पेस अतिक्रमणमुक्त होणार; मोबाइलमधून मुलांना मैदानावर आणण्याचा पालिकेचा प्रयत्न

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : मैदानाकडे न फिरकता फावल्या वेळेत मोबाइलवरील गेम खेळण्यात चिमुकले मग्न असतात. या मुलांना मोबाइलमधून बाहेर काढून मैदानावर आणण्याचा विडा महापालिका प्रशासनाने उचलला आहे. त्यासाठी विविध वसाहतींमधील ओपन स्पेस खेळण्यायोग्य करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. किमान १५० ओपन स्पेसवरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू केली जात आहे.

शहरातील प्रत्येक ले-आउट महापालिकेच्या नगररचना विभागाकडे मंजुरीसाठी येते. त्याला मंजुरी देताना नियमानुसार ओपन स्पेस सोडणे बंधनकारक असते. नगरचना विभाग मंजुरी देताच खुली जागा मनपाकडे हस्तांतरित करून घेते. या ओपन स्पेसची केअर टेकर संबंधित सोसायटीच असते. महापालिकेने मागील ३० वर्षांत शेकडोच्या संख्येने ले-आउटला मंजुरी दिली. हस्तांतरित खुल्या जागेचे नंतर काय होते हे प्रशासन कधीच बघत नाही. तक्रार आली तरच अतिक्रमण हटाव पथक धाव घेते. अन्यथा अनेक ओपन स्पेसवर बंगले, इमारती आणि अतिक्रमणे झालेली आहेत.

प्रशासक जी. श्रीकांत यांनी वेगवेगळ्या संकल्पना राबवायला सुरुवात केली. त्यामध्ये ‘चला खेळू या’ या मोहिमेचा समावेश आहे. या उपक्रमात विविध सोसायट्यांमधील ओपन स्पेस लहान मुलांसाठी खुले करून देण्यात येतील. पहिल्या टप्प्यात ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर लोकसहभागातून तेथे मुलांसाठी विविध खेळण्या, फन गेमची सोय केली जाईल. जेणेकरून चिमुकल्यांना मैदानांची ओढ लागेल. मनपा प्रशासनाच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वसामान्यांकडून स्वागत केले जात आहे. हडको एन-११ भागातील दोन ओपन स्पेस मंगळवारी मनपाने मोकळे केले. जेसीबीने जागा सपाट केली.

ओपन स्पेस कसे येतात?
ले-आउटशिवाय आरक्षणाच्या माध्यमातूनही खुल्या जागा सोडलेल्या असतात. विकास आराखड्यातील आरक्षणांचे भूसंपादन टीडीआर पद्धतीने केले जाते. त्यातूनही ओपन स्पेस मनपाला मिळतात.

लेआउटमध्ये ८०० ओपन स्पेस
शहर आणि आसपासच्या परिसरात किमान ८०० पेक्षा अधिक खुल्या जागा ले-आउटच्या माध्यमातून मनपाकडे हस्तांतरित केल्या आहेत. सिडको-हडको भागात सिडको प्रशासनाने अनेक खुल्या जागा ठेवल्या आहेत.

सर्वेक्षण करणे आवश्यक
शहरात मनपाच्या ताब्यात एकूण खुल्या जागा किती याचा अगोदर प्रशासनाला शोध घ्यावा लागणार आहे. त्यानंतर यादीनुसार कोणत्या खुल्या जागेवर अतिक्रमण आहे, हे वॉर्ड अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Municipal Corporation will remove encroachments on 150 open spaces in Chhatrapati Sambhaji Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.