महापालिकेच्या ‘कुरुक्षेत्र’ आखणीच्या हालचाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 06:55 PM2019-11-01T18:55:25+5:302019-11-01T18:57:41+5:30

आता वॉर्डांऐवजी प्रभागानुसार होणार निवडणुका 

Municipal corporations election 'Kurukshetra' planning will begin | महापालिकेच्या ‘कुरुक्षेत्र’ आखणीच्या हालचाली सुरू

महापालिकेच्या ‘कुरुक्षेत्र’ आखणीच्या हालचाली सुरू

googlenewsNext
ठळक मुद्दे२०११ च्या लोकसंख्येवरच रचना या आठवड्यात आयोगाचे पत्र येणार 

- विकास राऊत 

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकांचे निकाल लागत नाहीत तोवरच आता औरंगाबाद शहरातील राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. एप्रिल २०२० मध्ये महापालिका निवडणुका प्रस्तावित असून, यावेळी वॉर्डांऐवजी प्रभागनिहाय निवडणुका होणार आहेत.प्रभागांच्या रचनेसाठी २०११ ची लोकसंख्या गृहीत धरण्यात येणार आहे. प्रभाग आखणीसाठी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापालिका राज्य निवडणूक आयोगाकडून पत्र देण्यात येणार असल्याची माहिती आयोगाच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. 

आयोगाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, साधारणत: निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वी आरक्षण आणि प्रभाग (बहुसदस्यीय पद्धती) रचनेला सुरुवात केली जाते. त्यानुसार औरंगाबाद महापालिकेची निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणार असल्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पालिकेला प्रभाग, लोकसंख्या, आरक्षणाच्या अनुषंगाने पत्र देण्यात येईल. तीन किंवा चार वॉर्डांचा एक प्रभाग यानुसार रचना केली जाते. सम किंवा विषम संख्या, असा कुठलाही मुद्दा रचना आणि आखणीमध्ये नसतो. वॉर्डांच्या सीमा, लोकसंख्या याबाबत येत्या आठवड्यात आयोग पालिका प्रशासनाला पत्र देऊन अवगत करील. 

प्रभागरचनेचा एक फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यानुसारच रचना केली जाते. मुंबई महापालिका वगळता राज्यात सर्व मनपांच्या निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्याबाबत विधिमंडळाचा कायदा आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय नेत्यांनी कितीही दबाव आणला तरी त्यात बदल होऊन वॉर्डनिहाय रचना आता होणे शक्य नाही अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. ३ नोव्हेंबरपर्यंत राज्य निवडणूक ंआयोगाचे पत्र येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. सदरील पत्रासोबत प्रभाग रचना कशी करायची याचा नमुना पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

२०१५ मध्ये अशी झाली होती रचना 
२०१५ साली झालेल्या निवडणुकांसाठी जानेवारी २०१५ पर्यंत वॉर्डरचनेचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर सामाजिक आरक्षणानुसार वॉर्डांसाठी सोडत झाली होती. त्यामुळे यावेळीदेखील याच लगबगीने मनपा निवडणुका विभागाला काम करावे लागणार आहे. सध्या महापालिकेत ११५ वॉर्ड आहेत. यानुसार ३८ प्रभागांची रचना होईल. त्यात तीन सदस्यांचा एक प्रभाग असू शकेल.४ चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग करायचा म्हटल्यास २९ प्रभाग होणे शक्य आहे. २०१५ साली झालेल्या निवडणुकीसाठी २०११ च्या जनगणनेतील लोकसंख्येचा आधार घेण्यात आला होता. ११ लाख ७५ हजार ११६ एवढी लोकसंख्या त्यावर्षी समोर ठेवून वॉर्डांची आखणी झाली होती. मनपा निवडणुकीनंतर सातारा- देवळाई हे दोन वॉर्ड पालिकेत आले होते. त्यानंतर तिथे पोटनिवडणूक झाली होती.

Web Title: Municipal corporations election 'Kurukshetra' planning will begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.