महिन्याचे खर्च भागविताना महापालिकेची तारेवरची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 04:46 PM2020-09-24T16:46:47+5:302020-09-24T16:48:50+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचा फटका औरंगाबाद महापालिकेलाही बसला असून मागील पाच महिन्यांमध्ये अपेक्षित उत्पन्न न आल्यामुळे तब्बल २५० कोटींची तूट निर्माण झाली आहे.
मुजीब देवणीकर
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचा फटका औरंगाबाद महापालिकेलाही बसला असून मागील पाच महिन्यांमध्ये अपेक्षित उत्पन्न न आल्यामुळे तब्बल २५० कोटींची तूट निर्माण झाली आहे. महापालिकेच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मालमत्ता कर आणि पाणीपट्टीतून अत्यंत कमी उत्पन्न मिळाल्याने मनपाचे आर्थिक नियोजन कोलमडले असून महिन्याचे खर्च भागविताना महापालिकेची तारेवरची कसरत होत आहे.
मागील काही वर्षांपासूनच औरंगाबाद महापालिकेची अर्थस्थिती अत्यंत डळमळीत आहे. उत्पन्नापेक्षा चारपट अधिक विकास कामे करण्यात आल्याने २४० कोटी रूपयांच्या विकास कामांची देयके प्रलंबित आहेत. दोन वर्षांपासून कंत्राटदारांना बिल न दिल्यामुळे नविन विकास कामे घेण्यास कुणीही तयार नाही. त्यामुळे सध्या महापालिकेच्या निधीतून होणारी विकासकामेही ठप्प आहेत.
महापालिकेला मार्च महिन्यात मालमत्ता करातून कोट्यावधी रूपये मिळतात. विविध कार्यालयांकडून कर उपलब्ध होतो. कोरोनामुळे मात्र हा निधी अजूनपर्यंतही मिळालेला नाही. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात मालमत्ता करातून फक्त ३२ कोटी रूपये मिळाले असून १०० कोटी रूपये येणे मनपाला अपेक्षित होते. महापालिकेचा आर्थिक कणा असलेल्या नगर रचना विभागाकडूनही पाच महिन्यात फक्त १३ कोटी रूपये प्राप्त झाले. मालमत्ता विभागाने १ कोटी रूपयांची कमाई करून दिली असून मालमत्ता करातून उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात आल्याचे मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांनी सांगितले. यातच भर म्हणून मागील ७ महिन्यांपासून पालिकेची ८० टक्के यंत्रणा कोरोनाच्या कामात व्यस्त आहे. कोरोनासाठी जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत फक्त १४ कोटी रूपये महापालिकेला मिळाले. आणखी ३८ कोटी द्यावेत, अशी मागणी महापालिकेने केली आहे.