मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन थकले !
By Admin | Published: May 11, 2017 11:37 PM2017-05-11T23:37:27+5:302017-05-11T23:42:41+5:30
लातूर : लातूर मनपातील ६५० सफाई कामगार आणि वर्ग-३ च्या १५० कर्मचाऱ्यांचे वेतन थकले
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : लातूर मनपातील ६५० सफाई कामगार आणि वर्ग-३ च्या १५० कर्मचाऱ्यांचे वेतन थकले असून, साह्य अनुदान बंद झाल्याने मनपाचा कोष बिघडला आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे.
लातूर मनपाच्या आस्थापनातील कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन २ कोटी २५ लाखांचे आहे. शासनाकडून २ कोटी ८० लाख साह्य अनुदान मिळत होते. मात्र ते वर्षभरापासून बंद झाल्याने मनपाच्या तिजोरीवर ताण पडत आहे. विकास कामे तर सोडाच, कर्मचाऱ्यांचे वेतन करणेही मुश्किलीचे झाले आहे. महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुका मनपा फंडातून झाल्या आहेत. त्यामुळेही कोष बिघडला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वर्ग-३ च्या दीडशे कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. तर ६५० सफाई कामगारांचे एप्रिल महिन्याचे वेतन थकले आहे. केवळ साह्य अनुदान बंद झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनेचे पैसे वेतन अथवा आस्थापना खर्चासाठी वापरता येत नाही. त्यामुळे साह्य अनुदानावर कर्मचाऱ्यांचे वेतन अवलंबून होते. मात्र साह्य अनुदान बंद झाल्यामुळे वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन महिन्यांपासून वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांचे तर एक महिन्यापासून सफाई कामगारांचे वेतन रखडले आहे. त्यांच्याकडून दररोज वेतनाची मागणी होत आहे. मात्र अद्याप काहीही तोडगा निघाला नाही. कर्मचारी वेतनासाठी त्रस्त आहेत. (अधिक वृत्त हॅलो/२ वर)