निलंबित अधिकाºयांसाठी मनपा सभागृह एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 01:14 AM2017-09-19T01:14:53+5:302017-09-19T01:14:53+5:30
महापालिकेतील निलंबित अधिकाºयांना परत सेवेत घेतल्याच्या मुद्यावर सोमवारी सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेतील निलंबित अधिकाºयांना परत सेवेत घेतल्याच्या मुद्यावर सोमवारी सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला. शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी आयुक्तांच्या निर्णयाला विरोध दर्शविला. आयुक्तांचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा शिवसेना, भाजप, एमआयएम, काँग्रेस आदी पक्षांनी दिला. संपूर्ण सभागृह निलंबित अधिकाºयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. शेवटी जंजाळ यांनी गदारोळ करून स्वत:चे एक दिवसासाठी निलंबन करून घेतले.
सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर जंजाळ यांनी चर्चेत भ्रष्ट अधिकाºयांचा मुद्या उपस्थित केला. भाजपसह सर्वच पक्षांचे नगरसेवक हा मुद्या नको, विषयपत्रिका घ्या, असा आग्रह धरला. या मुद्यावरून सभागृहात गोंधळ सुरू झाला. महापौरांनी त्वरित पाच मिनिटांसाठी सभा तहकूब केली. महापौरांच्या अॅन्टी चेंबरमध्ये गुप्त खलबते सुरू झाली. जंजाळ यांनी काही नकली नोटा सोबत आणल्या होत्या. त्या आयुक्तांच्या अंगावर भिरकावणार असल्याचे सांगितले. आयुक्तांनीही यापुढे मी सर्वसाधारण सभेला येणार नाही, असा गर्भित इशारा दिला. महापौर व इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करून जंजाळ यांच्याकडील नोटा काढून घेतल्या. सभेत निलंबित अधिकाºयांच्या मुद्यावर चर्चा घेण्याचे ठरले. चर्चेत प्रशासनाकडून आयुक्त, उपायुक्त अय्युब खान यांनी संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. शासन आदेशानुसार सर्व निलंबित अधिकाºयांची विभागीय चौकशी सुरू असून, या चौकशीच्या आधीनच त्यांना कामावर घेण्यात आल्याचे वारंवार सांगण्यात आले. मात्र, जंजाळ यांचे समाधान होतच नव्हते. त्यांनी राजदंडही ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी सेनेचा एकही नगरसेवक त्यांच्यासोबत आला नाही. उलट भाजप, एमआयएम पक्षांनी महापौरांचा राजदंड पकडून ठेवला. अॅन्टी चेंबरमध्ये ठरल्याप्रमाणे महापौर बापू घडामोडे यांनी जंजाळ यांचे सदस्यत्व एक दिवसासाठी निलंबित केले. यानंतर जंजाळ यांचे समाधान झाले.