मनपाच्या आरोग्य अधिकारी सक्तीच्या रजेवर

By Admin | Published: September 15, 2015 12:04 AM2015-09-15T00:04:37+5:302015-09-15T00:35:55+5:30

औरंगाबाद : आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांच्या कारभारावरून सोमवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ झाला.

Municipal Health Officer on compulsory leave | मनपाच्या आरोग्य अधिकारी सक्तीच्या रजेवर

मनपाच्या आरोग्य अधिकारी सक्तीच्या रजेवर

googlenewsNext


औरंगाबाद : आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांच्या कारभारावरून सोमवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ झाला. मनपा रुग्णालयांतील डॉक्टरांच्या तक्रारी आणि जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीकडे होत असलेले दुर्लक्ष, या दोन्ही कारणांवरून सभागृहातील सर्वच सदस्यांनी कुलकर्णी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी लावून धरली. त्यानंतर मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांनी कुलकर्णी यांना रजेवर जाण्याचे आदेश दिले.
मनपा सेवेतील डॉक्टरांचे एक शिष्टमंडळ दुपारी सर्वसाधारण सभा सुरू असताना मनपात पोहोचले. या डॉक्टरांनी सभेच्या मध्यंतरात सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांच्या मनमानी कारभाराची तक्रार केली. मध्यंतरानंतर सभा सुरू होताच सभागृह नेते राजेंद्र जंजाळ आणि राजू वैद्य यांनी जैविक कचऱ्याचा मुद्दा उपस्थित झाला. शहरात साडेआठशे डॉक्टर नियमितपणे मनपाकडे पैसे भरतात, पण मनपाचा ठेकेदार त्यांच्याकडून जैविक कचरा उचलत नाही, असा आरोप त्यांनी केला. यावर डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. जयश्री कुलकर्णी या नगरसेवकांशीही उद्धटपणे बोलतात, अशी तक्रार अदवंत यांनी केली. एमआयएमचे नासिर सिद्दीक, शहर विकास आघाडीचे गजानन बारवाल, भाजपचे विजय औताडे, राजगौरव वानखेडे, सीमा खरात आदींनी त्यांच्या कारभारावर टीका केली. याचदरम्यान, औताडे यांनी कुलकर्णी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी केली. त्याला सर्वच सदस्यांनी जोरदार पाठिंबा दिला. सर्व महिला नगरसेविका या मागणीसाठी डायससमोर एकत्र जमल्या. सभागृहात एकच गोंधळ झाला. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी म्हणून महापौरांनी दहा मिनिटांसाठी सभा तहकूब केली. या दहा मिनिटांच्या काळात महापौर, इतर पदाधिकारी आणि आयुक्त यांच्यात सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर आयुक्तांनी कुलकर्णी यांना रजेवर जाण्याचे आदेश दिले.
चौकाचौकांत जैविक कचरा
मनपाने २००३ साली नाशिक येथील एका कंपनीला २० वर्षांकरिता जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीचे कंत्राट दिले आहे. शहरातील सर्व नोंदणीकृत हॉस्पिटल त्यासाठी ठराविक शुल्क मनपाकडे भरतात. तरीही ठेकेदारांकडून नियमितपणे हॉस्पिटलमधून जैविक कचरा उचलला जात नाही. ठिकठिकाणी सलाईनच्या रिकाम्या बॉटल्या, सिरिंज, रक्त लागलेल्या बॅण्डेज रस्त्यावर पडलेल्या दिसतात. नारेगाव येथील कचरा डेपोतही असा कचरा आढळून येतो, अशी तक्रार यावेळी बहुतेक नगरसेवकांनी केली.
मनपा सेवेतील डॉक्टरांनी सर्वसाधारण सभेच्या मध्यंतरात पदाधिकारी आणि आयुक्तांसमोर जयश्री कुलकर्णी यांच्याकडून होणाऱ्या छळाची व्यथा मांडली. हे सर्व डॉक्टर कुलकर्णी यांच्या कारभाराच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून आले होते. काही महिला डॉक्टरांनी तर निषेध म्हणून काळ्या साड्याही परिधान केल्या होत्या. जयश्री कुलकर्णी आम्हाला सतत अपमानास्पद वागणूक देतात. प्रत्येक वेळी निलंबनाची धमकी देणे, ज्येष्ठ डॉक्टरांनाही शटअप, गेट आऊटसारखे शब्द वापरणे हे तर नित्याचेच आहे. कामावरून घरी परतल्यानंतर फोन करून असभ्य भाषा वापरतात. त्यांनी प्रचंड दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे आमचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. आता त्यांचा त्रास असह्य झाला आहे. आम्हाला त्यांच्या हाताखाली काम करणे शक्य नाही. म्हणून आता तुम्हीच निर्णय घ्या, अशी मागणी या डॉक्टरांनी केली.

Web Title: Municipal Health Officer on compulsory leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.