थकीत करासाठी मनपाचा मोर्चा शासकीय कार्यालयांकडे; ३० लाखांचा कर वसूल
By मुजीब देवणीकर | Published: March 22, 2023 12:38 PM2023-03-22T12:38:19+5:302023-03-22T12:39:49+5:30
थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांनी आता शासकीय कार्यालयांकडे मोर्चा वळविला आहे.
छत्रपती संभाजीनगर : थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांनी आता शासकीय कार्यालयांकडे मोर्चा वळविला आहे. सा. बां. विभागाच्या निवासस्थानापोटी थकीत ११ लाख, तर अन्न व औषधी विभागाकडून १९ लाखांचा कर मंगळवारी वसूल करण्यात आला.
प्रभाग ५ येथील सहायक आयुक्त सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको एन-५ येथील सा. बां. विभागाच्या निवासस्थानापोटी थकीत असलेला कर वसूल करण्यात आला. सहायक आयुक्त संतोष टेंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कांचनवाडी-नक्षत्रवाडी येथील अन्न व औषधी विभाग कार्यालयाकडून १९ लाखांचा कर वसूल करण्यात आला. तसेच सिडको एन-८ येथील पंढरीनाथ जाधव यांच्याकडे १ लाख २२ हजार रुपयांची व नफिसा बेगम यांच्याकडे १ लाख १३ हजारांची थकबाकी असल्याने नळ कनेक्शन तोडण्यात आले.