महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती, अन्यथा १ हजाराचा लागणार दंड
By विकास राऊत | Published: September 22, 2023 07:54 PM2023-09-22T19:54:45+5:302023-09-22T19:55:24+5:30
विनाहेल्मेट दुचाकीवरून मुख्यालयात प्रवेश केल्यास एक हजाराचा दंड
छत्रपती संभाजीनगर : महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी दुचाकीवरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना २५ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालयांत अधिकारी, कर्मचारी दुचाकीवर विनाहेल्मेट आल्यास त्यांना थेट हजार रुपये तर सुरक्षारक्षक, नागरिक मित्र पथकातील कर्मचाऱ्यांना दुप्पट म्हणजे २ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी जाहीर केला.
प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले, २५ सप्टेंबरपासून हा निर्णय लागू केला जाईल. पालिकेत कर्मचारी विनाहेल्मेट आलेला दिसल्यास त्याला हजार रुपये दंड आकारला जाईल. सैनिकांमध्ये नियमांचे काटेकोर पालन केले जाते. असेच माजी सैनिक पालिकेत कंत्राटी म्हणून नागरिक मित्र पथक तसेच सुरक्षारक्षक सेवेत कार्यरत आहेत. ते विनाहेल्मेट आले तर त्यांना दुप्पट म्हणजे दोन हजार रुपयांचा दंड लावला जाईल. विनाहेल्मेट येणाऱ्यांवर नजर ठेवण्याची जबाबदारी सुरक्षारक्षकांवर असेल. दंडाची रक्कम ही पालिकेच्या अधिकारी-कर्मचारी कल्याण निधीत जमा होऊन त्यांच्या कल्याणासाठी त्या रकमेचा विनियोग केला जाईल.