लस न देताच प्रमाणपत्र वाटप प्रकरणात महापालिकेच्या पथकाकडून दहाजणांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 02:20 PM2021-08-31T14:20:33+5:302021-08-31T14:21:35+5:30
या प्रकरणात महापालिकेने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने सोमवारी दहा कर्मचाऱ्यांची चौकशी केली.
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंध लस न घेताच तब्बल १६ नागरिकांना प्रमाणपत्र वाटप झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी डीकेएमएम महाविद्यालयातील केंद्रावर घडला. या प्रकरणात महापालिकेने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने सोमवारी दहा कर्मचाऱ्यांची चौकशी केली. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप ठोस पाऊल उचलले नाही. पाेलिसांच्या कारवाईकडे मनपाचे लक्ष लागले आहे.
डीकेएमएम महाविद्यालयातील महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर शनिवारी ५५ नागरिकांनी रांगेत येऊन लस घेतली. दुपारी एक वाजता या केंद्राच्या सर्व्हरवर ७१ नागरिकांनी लस घेतल्याची नोंद झाली. अचानक १६ नागरिक वाढले कोठून असा प्रश्न संगणक ऑपरेटरला पडला. त्याने त्वरित वरिष्ठांना ही बाब कळविली. त्यानंतर मनपाने लगेच हे लसीकरण केंद्र तूर्तास बंद केले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी तीनजणांची समिती स्थापन केली. त्यात डॉ. मेघा जोगदंड, डॉ. मनीषा भोंडवे तांत्रिक कर्मचारी हेमंत राठोड यांचा समावेश आहे. डॉ. मंडलेचा यांनीदेखील लसीकरण केंद्रावर जाऊन तेथील कर्मचाऱ्यांची चौकशी केली.
चौकशी समितीमधील सदस्यांनी त्या लसीकरण केंद्रावरील दहा कर्मचाऱ्यांची चौकशी केली. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांचे जबाब नोंदविले असून, दोषी कोण या निष्कर्षाप्रत आम्ही आलो नाही. बेगमपुरा पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. पोलिसांच्या सायबर सेलची मदत घ्यावी लागणार आहे. सायबर सेलमधील अधिकारी चौकशीसाठी नियुक्त केले जातील. त्यातून अजून काही बाबी स्पष्ट होतील. डीकेएमएम केंद्रावरचा घडलेला प्रकार हा पहिलाच प्रकार आहे. या प्रकारामुळे आम्हीदेखील सतर्क झालो आहोत.
हेही वाचा - लस न घेताच १६ जणांना प्रमाणपत्र; महापालिकेच्या कोरोना लसीकरणात महाघोटाळा
जिन्सी, आरेफ कॉलनीची चौकशी नाही
शासकीय कार्यालये, खासगी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना लस सक्तीची केली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये जिन्सी, आरेफ कॉलनी केंद्रावर अशा पद्धतीने अनेक नागरिकांना लस दिल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या दोन्ही केंद्रांची मनपाने अद्याप चौकशी सुरू केलेली नाही, हे विशेष.
युजर नेम, पासवर्ड हॅक केला असेल
डीकेएमएम महाविद्यालयातील केंद्रात कोविन ॲपद्वारे लसीकरण सुरू होते. हे काम सुरू असताना हॅकरने सोयीनुसार युजर आणि पासवर्ड चोरला असेल. ॲपमध्ये व्हायरस आल्यानंतरही ते हॅक करणे सोपे असते. हॅकरने संपूर्ण शहरातील वेबसाईट हॅक न करता एकाच केंद्राला लक्ष्य केले असण्याची शक्यता आहे.
- श्रेयस मोदी, सायबर तज्ज्ञ.