महापालिका वॉर्ड आरक्षण : ‘सब कुछ मॅनेज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:16 PM2020-02-04T12:16:06+5:302020-02-04T12:22:13+5:30

काहींनी चालविली न्यायालयात धाव घेण्याची तयारी

Municipal ward reservation: 'Manage everything' | महापालिका वॉर्ड आरक्षण : ‘सब कुछ मॅनेज’

महापालिका वॉर्ड आरक्षण : ‘सब कुछ मॅनेज’

googlenewsNext
ठळक मुद्देसोडतीची औपचारिकता  उमेदवार डोळ्यासमोर ठेवून आरक्षणराजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण शहराचे लक्ष लागलेल्या वॉर्ड आरक्षणाची सोडत आज पार पडली. सोडतीच्या नावावर ‘सब कुछ मॅनेज’ करून ठेवलेल्या वॉर्डांची निव्वळ घोषणा करण्यात आल्याचा आरोप नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचा उमेदवार डोळ्यासमोर ठेवून अगोदर वॉर्ड रचना तयार झाली. त्यानंतर आरक्षण टाकण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेबद्दल राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महापालिकेच्या इतिहासात अशा पद्धतीची मॅनेज प्रक्रिया यापूर्वी कधीच झाली नसल्याचा आरोप होत आहे.

महापालिकेची निवडणूक एप्रिल-२०२० मध्ये होणार आहे. त्यादृष्टीने मागील एक महिन्यापासून वॉर्ड रचना तयार करण्याचे काम सुरू होते. निवडणूक आयोगाच्या परवानगीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात वॉर्ड आरक्षणाची सोडत काढण्यात आली. शहरातील ११५ वॉर्डांपैकी फक्त १५ वॉर्डांसाठी वेगवेगळ्या प्रवर्गात चिठ्ठ्या काढण्यात आल्या. उर्वरित १०० वॉर्डांची निव्वळ घोषणा करण्यात आली. यापूर्वी महापालिकेच्या सहा निवडणुकांमध्ये अशी पद्धत अजिबात वापरण्यात आली नाही. महापालिका आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ठरवून आणलेल्या वॉर्डांची घोषणा केली. २००५, २०१० आणि २०१५ मध्ये ज्या वॉर्डांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास वर्ग यांच्यासाठी आरक्षित नव्हते, असे वॉर्ड आता खुले करण्यात आल्याचे वारंवार सांगण्यात आले. आरक्षणाची ठरविण्यात आलेली प्रक्रिया अनाकलनीय पद्धतीची होती, हे विशेष.

ठरवून वॉर्डांची रचना तयार
महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून अगोदर सोयीनुसार वॉर्ड रचना तयार करून घेतली. ज्या नगरसेवकांना आपला वॉर्ड पुन्हा आरक्षित करून घ्यायचा होता, त्यांनी इतर वॉर्डातील मागासवर्गीय मतदार आपल्या वॉर्डात आणले. ज्यांना आपला वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवायचा होता, त्यांनी वॉर्डातील काही मतदार ब्लॉक बदलून सोयीचे ब्लॉक आणले. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास सिडको एन-१ वॉर्ड मागील निवडणुकीत एस.सी. प्रवर्गासाठी राखीव होता. यंदाही तो राखीव ठेवला आहे. बौद्धनगर उत्तमनगर मागील निवडणुकील खुला होता. यंदाही त्याला सोयीनुसार खुला ठेवण्यात आला. मयूरनगर-सुदर्शननगर मागील निवडणुकीत खुल्या प्रवर्गासाठी होता. यंदाही हा वॉर्ड खुला कसा राहतो? असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. चेतनानगर-राजनगर मागील निवडणुकीत एस. टी. प्रवर्गासाठी राखीव होता. आता ओबीसी महिलांसाठी राखीव कसा ठेवला.

तीन वॉर्डांसाठी शहरात फेरबदल का?
सातारा-देवळाईत तीन नवीन वॉर्ड तयार करायचे होते. त्यासाठी शहरातील वॉर्डांची रचना तोडण्याचा नेमका अर्थ काय? तोडण्यात आलेले वॉर्ड कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित ठेवायचे यादृष्टीने एक हजार मतदानाचे ब्लॉक उचलण्यात आले. हाच निकष इतर वॉर्डांसाठी वापरण्यात आला नाही. सोयीच्या उमेदवारांसाठी काही वॉर्डांमध्ये अशा पद्धतीचे फेरफार करण्यात आले. यावरही संशयाचे ढग दाटून आले आहेत. 

एससी प्रवर्गासाठी उतरता क्रम
११५ पैकी २२ वॉर्ड एससी प्रवर्गासाठी राखीव ठेवायचे होते. सातारा-देवळाईत तयार केलेल्या नवीन वॉर्डांपासून उतरता क्रम ठरविण्यात आला. हा क्रम ठरविताना एकाच परिसरातील एकमेकांना लागून असलेल्या वॉर्डांवर आरक्षण टाकण्यात आले. वॉर्ड ओलांडून हे आरक्षण का टाकले नाही? असा प्रश्न इच्छुक उमेदवार उपस्थित करीत आहेत.

चक्रानुक्रमे म्हणत टाकले आरक्षण
एस.सी., ओबीसी, महिला, सर्वसाधारण महिलांचे आरक्षण ठरविताना चक्रानुक्रमे पद्धत राबविण्यात आल्याचे आरक्षण सोडतीप्रसंगी वारंवार सांगण्यात येत होते. वॉर्ड आरक्षणाच्या सोडतीत सर्वांनाच चक्रव्यूहात अडकविण्यात आल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती.

Web Title: Municipal ward reservation: 'Manage everything'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.