तक्रारींचे निरसन करण्यासाठी मनपाचे वॉररूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:29 AM2017-11-06T00:29:27+5:302017-11-06T00:29:29+5:30
नागरिकांच्या तक्रारी त्वरित सोडविण्यासाठी खास एका वॉररूमची स्थापना करण्यात येणार आहे. मनपाशी संबंधित माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापरही प्रभावीपणे करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेच्या कोणत्याही विभागात अथवा वॉर्ड कार्यालयात नागरिकांनी साध्या कागदावर तक्रार केली तर त्याची अजिबात दखल घेण्यात येत नव्हती, त्यामुळे नागरिकांनी महापालिकेला दूषणे देत तक्रारी करणेच बंद करून टाकले होते. महापालिकेची ही प्रतिमा बदलण्यासाठी आता सकारात्मक प्रयत्न सुरू झाले आहेत. नागरिकांच्या तक्रारी त्वरित सोडविण्यासाठी खास एका वॉररूमची स्थापना करण्यात येणार आहे. मनपाशी संबंधित माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापरही प्रभावीपणे करण्यात येणार आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात वॉररूम सुरू केली जाणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर अधिकारी व कर्मचारी अजिबात दखल घेत नव्हते. मनपा प्रशासनाच्या या हेकेखोर भूमिकेमुळे नागरिकांचा मनपा प्रशासनावर रोष वाढला आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जावी, समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्र्गत मनपाच्या मुख्य कार्यालयात वॉर रूम सुरू करण्याचा निर्णय महापौर घोडेले यांनी घेतला आहे. वॉररूम सुरू करण्यासाठी आयुक्त डी.एम. मुगळीकर यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनीही त्वरित तयारी दर्शवली. वॉर रूममध्ये प्राप्त होणाºया तक्रारींची नोंद घेतली जाणार आहे. नागरिकांकडून प्राप्त होणारी तक्रार संबंधित विभागाकडे पाठविण्यात येईल, त्या विभागाकडे पाठपुरावा करून तक्रारींचे निराकरण करण्यात येऊन नागरिकांना त्याबद्दलची माहिती वॉर रूमद्वारे कळवण्यात येईल.
तक्रार सोडवण्यासाठी ७ दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागणार नाही. या तक्रारींचा दररोजचा अहवाल महापौर कार्यालयात मागवण्यात येईल. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिक आणि मनपा प्रशासन यांच्यात समन्वय साधला जाईल.