महापालिका रंगमंदिर सोडून ताजमहाल तर बांधत नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 06:25 PM2019-11-06T18:25:49+5:302019-11-06T18:31:02+5:30

मोडक्या रंगभूमीवर खऱ्या कलाकारांचा आविष्कार

Is the municipality building a theater or Taj Mahal? | महापालिका रंगमंदिर सोडून ताजमहाल तर बांधत नाही ना?

महापालिका रंगमंदिर सोडून ताजमहाल तर बांधत नाही ना?

googlenewsNext
ठळक मुद्देपालिकेच्या नाकर्तेपणाचा रंगकर्मींकडून असाही कलात्मक निषेध 

औरंगाबाद : शहराचे वैभव असलेली एकनाथ रंगमंदिराची अवस्था पर्यटनाच्या राजधानीमधील एखाद्या ऐतिहासिक वास्तूसारखी झाली आहे. दुरुस्ती, आधुनिकीकरणाच्या नावाखाली रंगमंदिर बंद करून १९ महिने पूर्ण झाले आहेत. महानगरपालिका रंगमंदिर बांधतेय की ताजमहाल, असा प्रश्न आता पडला आहे, असा संतप्त सवाल लेखक, कवी दासू वैद्य यांनी उपस्थित केला. 

प्रसंग होता, मराठी रंगभूमी दिनानिमित्त मंगळवारी (दि.५ नोव्हेंबर) आयोजित कार्यक्रमाचा. संत एकनाथ रंगमंदिराचे आधुनिकीकरण करून लवकारात लवकर तिथे प्रयोग सुरू करण्यात यावे, अशी मागणी रंगकर्मी, रसिकांनी मागील १९ महिन्यांपासून लावून धरली आहे. मात्र, मनपा पदाधिकारी, अधिकाऱ्यांतील उदासीनतेमुळे कासवालाही लाजवेल एवढ्या संथगतीने काम सुरू आहे. ज्या अवस्थेत आहे तेथेच आज रंगभूमी दिन साजरा करण्याचा ठाम निश्चय मनी बाळगून येथे कलाकार व रसिक जमले होते. यात पं. विश्वनाथ ओक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रंगमंदिराची भग्न अवस्था पाहून दासू वैद्य यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, ज्या संतांच्या नावाने हे रंगमंदिर आहे. त्या एकनाथ महाराजांवर एक व्यक्ती १०८ वेळा थुंकला होता. अशा गोष्टी जुन्या होत नसतात फक्त संदर्भ बदलले जातात. त्या नाव्याने समोर येत असतात. याच प्रसंगातून आपण जात आहोत. जे कोणी एकनाथ रंगभूमीच्या पावित्र्याविषयी बोलत आहेत, रंगमंदिर पुन्हा सर्वांसाठी खुले व्हावे, यासाठी जे कलाकार, रसिकांनी चळवळ सुरू केली आहे, त्यांच्यावर ‘थुंकले जात आहे’ (थुंकणे याचा अर्थ अवहेलना करणे). मात्र, अवहेलना करणाऱ्यांना आता जवाब विचारण्याची वेळ आली आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन चळवळीला आणखी बळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. कोणत्याही सरकारी कामात अशीच उदासीनता असते. त्यास हे रंगमंदिरही अपवाद नाही, अशा मोजक्या शब्दात पं. विश्वनाथ ओक यांनी खेद व्यक्त केला. कलाकार रोहित देशमुख, प्रा. कमलेश महाजन, शीतल रुद्रवार, रसिकांच्या वतीने सारंग टाकळकर, श्रीकांत उमरीकर यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. यावेळी राजेंद्र जोशी, प्रा. मोहन फुले, प्रेषित रुद्रवार, राजू परदेशी, पद्मनाभ पाठक, निशाद रांगणीकर, अमित वांगीकरसह अन्य कलाकारही उपस्थित होते. 

तिकीट घेण्यासाठी मनपात जावे लागेल!
सारंग टाकळकर यांनी सांगितले की, एकनाथ रंगमंदिराच्या आधुनिकीकरणासाठीच्या खर्चाची खोटी आकडेवारी महानगरपालिकेने दिली आहे. आम्ही सुचविले होते की, रंगमंदिर संपूर्णपणे वातानुकूलित करू नका. पंखे लावले तरी चालतील. कारण, राज्यात ज्या ठिकाणी वातानुकूलित रंगमंदिर आहे त्यांचे भाडे ५५ हजारांपर्यंत आहे. ते व्यावसायिक नाट्यसंस्थेलाही परवडणारे नाही. मनपा काही नफा कमविण्यासाठी नाही. यामुळे वातानुकूलित करू नये जेणेकरून भाडेही कमी लागेल. तसेच संपूर्ण आराखडा तयार करताना तिकीट विक्रीगृहच त्यात दाखविण्यात आले नाही, असा आरोप टाकळकर यांनी केला. जसे परवानगी काढण्यासाठी मनपात जावे लागते, तसेच उद्या नाटकाचे तिकीट घेण्यासाठी मनपात जावे लागेल की काय, असे दासू वैद्य म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

बतावणी ठरली हिट 
मराठी रंगभूमीनिमित्त रंगकर्मी मदन मिमरोट व दत्ता जाधव या दोघांनी बतावणी सादर केली. दत्ता जाधव म्हणाले की, मित्रा कालच मुंबईहून आलो. काय रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते कळालेच नाही. रंगभूमी दिन म्हटलं, एकनाथ रंगमंदिरात जावे. बघितले तर मोडकळीस आलेले रंगमंदिर. मिमरोट म्हणाले की, अरे रंगमंदिराची अवस्था एकदम कलाकाराच्या जीवनासारखीच झाली आहे (हास्य). असे म्हणत त्यांनी बतावणीतून मनपाच्या कारभारावर मार्मिक भाष्य केले. यानंतर गायत्री तरतरे व बालाजी गांजवे यांनी अंध व्यक्ती व त्याच्या प्रेयसीच्या जीवनावरील लघु नाटिका सादर करून सर्वांना खिळवून ठेवले. स.भु.च्या संगीत विभागातील संध्या कानडे यांनी ‘मोगरा फुलला’ हे गीत गाऊन पुन्हा एकनाथ रंगमंदिर मोगऱ्यासारखे खुलेल, असा आशावाद व्यक्त केला.

भग्नावस्थेतील राजवाडा
काही कलाकार, रसिकांनी मराठी रंगभूमीदिनी सकाळी ११.३० वाजता संत एकनाथ रंगमंदिरात प्रवेश केला. तेव्हा तेथील भयाण अवस्था पाहून सर्वांच्या काळजात धस्स झाले. सर्व खुर्च्या काढून टाकलेला होत्या. पायऱ्यांवरच्या फरशाही काढलेल्या होत्या. जागोजागी वायरी लटकत होत्या. व्यासपीठावर हीच अवस्था होती. काँक्रीटचा एक थर करून त्यावर आळे तयार केले होते; पण त्यात पाणी नव्हते, सुकून गेले होते. एखादे राज्य खालसा व्हावे व तेथील पडलेला, भग्न झालेला राजवाडा आपण पाहतो की काय, अशी अवस्था आमची झाली, असे दासू वैद्य म्हणाले. रंगमंदिराची विदारक अवस्था पाहून मन खिन्न झाले, असे संध्या कानाडे म्हणाल्या. रंगमंदिराचे वैभवशाली दिवस बघितले; पण असे भग्नावस्थेतील दिवस बघावे लागतील, याची कल्पनाही केली नव्हती, असे रंगकर्मी दत्ता जाधव यांनी म्हटले. 

दर शनिवारी रंगमंदिराबाहेर नाटक 
फेब्रुवारीपासून निवडणुकीचे वेध लागत आहेत. यामुळे मार्च २०२० पर्यंतही हे रंगमंदिर तयार होत नाही. मात्र, पुढील मराठी रंगभूमी दिन येथे पडदा उघडून साजरा करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, कारण मनपाने लवकरात लवकर रंगमंदिर तयार करावे ही मागणी रंगकर्मींनी केली. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत दर शनिवारी सायंकाळी एकनाथ रंगमंदिरासमोरील भागात सर्व रंगकर्र्मींनी एकत्र येऊन रस्त्यावर नाटक सादर करण्याचा निर्णय यावेळी घेतला. तसेच सोशल मीडियावरही व्यापक चळवळ उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला. 

Web Title: Is the municipality building a theater or Taj Mahal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.