मनपाला स्वतःच्या पेट्रोल पंपातून सव्वा कोटींची कमाई; अनेकांना रोजगारही दिला
By मुजीब देवणीकर | Published: July 1, 2023 08:22 PM2023-07-01T20:22:57+5:302023-07-01T20:23:18+5:30
मनपाच्या पंपावरील पेट्रोल - डिझेल विक्रीत २०० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे
छत्रपती संभाजीनगर : शहरात महापालिकेचे मुख्य रस्त्यांवर अनेक भूखंड आहेत. या भूखंडांचा वापर व्यावसायिक दृष्टीने व्हावा म्हणून पेट्रोल पंप उभारणीला सुरुवात झाली. दोन वर्षांपूर्वी जकात नाका येथे पहिला पंप सुरू केला. मागील दोन वर्षांत या पेट्रोल पंपाने तब्बल १ कोटी २७ लाख रुपयांची निव्वळ कमाई केली. अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार दिला. ६५ लाख खर्चवगळता तिजोरीत ६२ लाख रुपये आले.
जकात नाका येथील प्रगती पेट्रोलियमचा बुधवारी द्वितीय वर्धापन दिन साजरा करण्यात आला. प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली ई-२० व ग्रीन डिझेल विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या पुढाकारातून पेट्रोल पंप सुरू करण्यात आला. एकूण पाच प्रकारच्या इंधनांचा या पंपात एक लाख लिटरचा स्टॉक ठेवता येऊ शकतो. पंपावरून दररोज पालिकेच्या वाहनांना २,५०० लिटर व स्मार्ट सिटी बसेसला ५,००० लिटर इंधनाचा पुरवठा केला जातो. वर्धापन दिन कार्यक्रमात प्रगती पेट्रोलियमच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्याबद्दल भेटवस्तू देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी उपायुक्त अपर्णा थेटे, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता डी. के. पंडित, उपअभियंता अमोल कुलकर्णी, इंडियन ऑईल कंपनीचे विजय चावरे, विक्री व्यवस्थापक राहुल आहेरकर, वितरक शहा व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
पेट्रोल पंपाच्या विक्रीत तब्बल २०० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. पहिल्या वर्षी निव्वळ नफा २२ लाख रुपये एवढा होता. दोन वर्षांचे मिळून १ कोटी २७ लाख उत्पन्न मिळाले. जागेचे भाडे प्रतिमहा १ लाख ५० हजार रुपये पालिकेला मिळत असून, वर्षभरात एकूण १८ लाखांचे उत्पन्न मिळाले.