मनपा पाणीपुरवठा योजनेवरील ते पत्र न्यायालयात मांडणार, शासन म्हणे रक्कम आम्ही देणार

By विकास राऊत | Published: January 13, 2024 02:34 PM2024-01-13T14:34:55+5:302024-01-13T14:35:01+5:30

८२२ कोटी कसे उभारायचे यावर मनपा गांभीर्याने चिंतन करणार

Municipality will present the letter on municipal water supply plan to the court, we will pay the amount that the government says | मनपा पाणीपुरवठा योजनेवरील ते पत्र न्यायालयात मांडणार, शासन म्हणे रक्कम आम्ही देणार

मनपा पाणीपुरवठा योजनेवरील ते पत्र न्यायालयात मांडणार, शासन म्हणे रक्कम आम्ही देणार

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने शहर पाणीपुरवठा योजनेतील २७४० कोटींपैकी महापालिकेचा ८२२ कोटी रुपयांचा हिस्सा भरण्यास नकार दिल्याचे पत्र न्यायालयात सादर करण्यात येईल, पालिकेला ८२२ कोटी उभारण्यासाठी काय करता येईल. यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. असे प्रशासक जी. श्रीकांत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपाचा वाटा शासनच भरणार असल्याचे गंगापूरमध्ये गुरुवारी पत्रकारांशी बोलतांना नमूद केले. शहर पाणीपुरवठा योजना अमृत-२ मधून राबविली जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे काम करीत आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत योजना पूर्ण होईल, असा दावा केला जात असतानाच शासनाने ८२२ कोटींबाबत पालिकेला पत्र पाठविल्याने योजनेच्या कामावर याचा परिणाम होणे शक्य आहे. ही रक्कम उभी करणे पालिकेच्या आवाक्याबाहेर आहे.

शासनाने पालिकेच्या वाट्याचा निधी भरावा, यासाठी दोनवेळा मनपाने प्रस्ताव पाठविले आहेत. योजनेबाबत न्यायालयात दाखल याचिकेची वारंवार सुनावणी होत आहे. त्यात न्यायालयाने देखील पालिकेचा हिस्सा शासनाने भरावा,असे निर्देशित केले आहे. नगरविकास विभागाने पत्र देऊन ८२२ कोटी राज्य शासन देऊ शकत नाही. पालिकेने स्वत:च्या पातळीवर निधीची तरतूद करावी, असे कळविले. त्यामुळे मनपा प्रशासनला मोठा हादरा बसला आहे. एवढा निधी उभा करणे हे पालिकेच्या सध्या तरी आवाक्यात नाही.

पुन्हा विनंती करू शासनाला...
डिसेंबर २०२४ मध्ये योजना पूर्ण होईल. ११ महिन्यांत ८२२ काेटींचा निधी कसा उभारणार? यावर बोलतांना प्रशासक जी.श्रीकांत म्हणाले, राज्य शासनाला पुन्हा एकदा पत्र पाठवून विनंती करू. त्यासोबतच शहरातील मंत्री, लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली जाईल. शहरासाठी पाणी योजनेचे काम होणे गरजेचे आहे. गरज पडल्यास कर्ज काढण्यासाठी शासनाची मदत घ्यावी लागेल. इतर योजनांना कात्री लावावी लागेल. असेही प्रशासकांनी नमूद केले.

योजनेत असा आहे वाटा....
एकूण योजनेची किंमत: २७४० कोटी
केंद्र सरकारचा वाटा २५ टक्के : ६८५ कोटी
राज्य शासनाचा वाटा ४५ कोटी : १२३३ कोटी
महापालिकेचा वाटा ३० कोटी : ८२२ कोटी
सध्या योजनेचे काम किती : ५० टक्के झाल्याचा दावा

उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले
शहर पाणीपुरवठा योजनेत महापालिकेच्या वाट्याची रक्कम शासनच भरणार आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी गंगापूर येथील कार्यक्रमाप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी फडणवीस यांच्या कानावर शासनाकडून आलेला पत्रप्रपंच घातला. त्यानंतर फडणवीस यांनी शासनच वाटा भरील असे नमूद केले. सावे म्हणाले, ८२२ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून पालिकेला मिळतील, यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू केले आहेत.

 

Web Title: Municipality will present the letter on municipal water supply plan to the court, we will pay the amount that the government says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.