‘अमंगल’ कामावर मनपाचा हातोडा
By Admin | Published: October 8, 2016 01:08 AM2016-10-08T01:08:12+5:302016-10-08T01:17:51+5:30
औरंगाबाद : जाधववाडी चौकातील जायस्वाल मंगल कार्यालयावर शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता अचानक महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या जेसीबीने धडक दिली
औरंगाबाद : जाधववाडी चौकातील जायस्वाल मंगल कार्यालयावर शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता अचानक महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या जेसीबीने धडक दिली. अंडरग्राऊंडमधील १५ बाय ६० फुटांचे अतिक्रमण, पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. ही कारवाई थांबविण्यासाठी मनपातील सत्ताधाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, मनपा आयुक्तांनी राजकीय दबाव झुगारून मंगल कार्यालयाचे ‘अमंगल’ काम हटविले.
विद्यानिकेतन सोसायटी एन-९ येथील चेअरमनला मनपाने २६ डिसेंबर २०१४ रोजी रामकृष्ण हॉस्पिटलच्या बाजूस बांधकाम परवानगी दिली. याठिकाणी जायस्वाल मंगल कार्यालय उभारण्यात आले. मनपाने दिलेल्या बांधकाम परवानगीशिवाय मालकाने साईड मार्जीनमध्ये तब्बल १५ बाय ६० फूट लांब अतिक्रमण केले. अंडरग्राऊंडमध्ये आठपेक्षा अधिक खोल्या उभारण्यात आल्या. या खोल्या तळमजल्यातील पार्किंगला जोडण्यात आल्या. मंगल कार्यालयाच्या बाजूला १५ मीटर रस्त्यावरून हे अतिक्रमण दिसतही नव्हते. कारण त्यावर सिमेंटचा स्लॅब आणि माती टाकण्यात आली होती. मंगल कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर २ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम करण्यात आले. दुसऱ्या मजल्यावर तीन अधिकृत खोल्या उभारण्यात आल्या.
शुक्रवारी सकाळी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सदरील अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपायुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता एस. एस. कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता कारभारी घुगे, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद यांनी मंगल कार्यालयाच्या दुसऱ्या आणि पहिल्या मजल्याचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. त्यानंतर मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने १५ मीटर रस्त्याच्या कडेला खड्डा करून जमिनीतील अतिक्रमण जमीनदोस्त केले. ही कारवाई थांबविण्यासाठी मनपातील सत्ताधारी मंडळींनी बरेच प्रयत्न केले. मात्र, आयुक्तांनी कारवाई पूर्ण केल्याशिवाय कोणीही जागेवरून हलणार नाही, असे आदेश दिले होते.