उद्योगनगरीतील ‘मुन्नाभाई’ आरोग्य विभागाच्या रडारवर; दोन बोगस डॉक़्टरांना पथकाने पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 12:44 PM2023-12-23T12:44:54+5:302023-12-23T12:45:04+5:30
गरीब कामगारांच्या अज्ञानाचा फायदा; रांजणगावात दोन मुन्नाभाई डॉक़्टरांना पथकाने पकडले
वाळूज महानगर : उद्योगनगरीत गरीब कामगारांच्या अज्ञानाचा फायदा घेत रुग्णालय थाटून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांना शुक्रवारी आरोग्य विभागाच्या पथकाने रांजणगावात पकडले. शैलेंद्र नितू दास (२८) व संजय दिलीप मंडल (३५, दोघेही रा. रांजणगाव) या दोन बोगस डॉक़्टरांना पकडून त्यांच्या ताब्यातून औषध साठा व वैद्यकीय उपकरणे जप्त करण्यात आली.
उद्योगनगरीतील रांजणगाव, जोगेश्वरी, वाळूज व परिसरात अनेकांनी वैद्यकीय शाखेची कुठलीही पदवी नसताना रुग्णालये थाटून गरीब रुग्णांच्या जिवाशी खेळत असल्याच्या तक्रारी दक्ष नागरिकांनी आरोग्य विभागाकडे केल्या. गंगापूरचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रंगनाथ तुपे, सहायक गटविकास अधिकारी डॉ. स्नेहल शेलार, वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता निर्मळ, अन्न व औषध विभागाच्या औषध निरीक्षक अंजली मिटकर, विस्तार आरोग्य अधिकारी हिरामण गोरे, आरोग्य सहायक रामचंद्र निकम, कानबा झाटे, पोहेकॉ. रेखा चांदे, पोकॉ. राहुल बंगाळे आदींच्या पथकाने शुक्रवारी दुपारी रांजणगावातील श्रीकृष्ण नॅचरोपॅथिक व पार्वती नॅचरोपॅथिक या दोन दवाखान्यांवर छापा मारला. पथकातील सदस्यांनी या दोघांकडे वैद्यकीय पदवी, रुग्णालय नोंदणीची कागदपत्रे इ. विषयी चौकशी केली असता त्यांनी परवाना व वैद्यकीय पदवी नसल्याचे सांगितले. दोघांकडे भारत सेवक समाज संस्थेचे प्रमाणपत्र आढळले. या प्रमाणपत्रावर बीएसएस डिप्लोमा इन नॅचरोपॅथी ॲण्ड योगिक सायन्स असा मजकूर आहे.
गुन्हा दाखल
आरोग्य विभागाच्या पथकाने छापा पकडलेल्या शैलेंद्र दास व संजय मंडळ यांच्या ताब्यातून विविध प्रकारची औषधे तसेच रुग्णांना दिलेल्या औषधांच्या पावत्या, वैद्यकीय उपकरणे इ. साहित्य जप्त करण्यात आले. या दोन बोगस डॉक्टरांविरुद्ध डॉ. तुपे यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून या दोन मुन्नाभाईंविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक इंगोले करीत आहेत.
-------------------