महामारीच्या काळात मुन्नाभाई एमबीबीएस जोरात, ४ बोगस डाॅक्टरांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:05 AM2021-06-26T04:05:42+5:302021-06-26T04:05:42+5:30
योगेश पायघन औरंगाबाद : कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यात बोगस डाॅक्टरांची प्रॅक्टिस जोरात सुरू आहे. खरेखुरे डाॅक्टर वावरत नसतील, अशा ...
योगेश पायघन
औरंगाबाद : कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यात बोगस डाॅक्टरांची प्रॅक्टिस जोरात सुरू आहे. खरेखुरे डाॅक्टर वावरत नसतील, अशा आवेशात बोगस डाॅक्टरांकडून औषधोपचाराच्या नावाखाली रुग्णांकडून पैसे उकळले जात आहेत, तर या महामारीच्या काळात ग्रामीणमध्ये ३ तर शहरात १ अशा ४ डाॅक्टरांवर तर ग्रामीण भागात २ दवाखाने, एका प्रयोगशाळेवर कारवाई करण्यात आली आहे.
कोरोना महामारीचा कहर सुरू झाला. संसर्गात जिल्हा पहिल्या दहामध्ये पोहोचला. सक्रिय रुग्णांची व रुग्णालयातील भरती रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यामुळे बेड कमी पडू लागले. त्यावेळी भीतीच्या सावटात असलेल्या रुग्ण नातेवाइकांकडून कोरोनाच्या उपचाराच्या नावाखाली लुटण्याचे काही बोगस डॉक्टरांनी लुटल्याचे अनेक प्रकार समोर आले. तज्ज्ञ डाॅक्टरांनी अशा गंभीर रुग्णांबद्दल चिंताही व्यक्त केली. मात्र, लूट झाली, त्यांनीही किंवा परिसरातील जाणकारांनी तक्रार केली नसल्याने, आरोग्य विभागाकडूनही कोणतीही ठोस कारवाई या बोगस डाॅक्टरांवर झाली नाही. बोगस डाॅक्टरांवर कारवाईसाठी जाण्यापूर्वीच त्यांना टिप मिळते. त्यामुळे अनेक वेळा तपासणीला गेलेल्या पथकाच्या हाती काहीच लागत नाही, नंतर ते बोगस डाॅक्टर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी दुकान थाटत असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.
शहरातील चिकलठाणा परिसरातील बंगाली डाॅक्टरवर डिसेंबरमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर, दुसरी कारवाई अद्याप झाली नसल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.नीता पाडळकर यांनी सांगितले, तर ग्रामीण भागात वैजापूर, वाळूज परिसर, खुलताबाद तालुक्यात कारवाई करण्यात आली असून, महालगांव येथे एका लॅबसह कोरोनाचे वाळूजमध्ये कोरोना उपचार करणाऱ्या एका रुग्णालयाची परवानगी रद्द करण्यात आली. या कारवाई मी जिल्हा परिषदेत डीएचओ म्हणून रुजू झाल्यावर केल्या असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.सुधाकर शेळके यांनी सांगितले, तर जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.सुंदर कुलकर्णी यांच्याकडून त्यांच्या कार्यक्षेत्रात कारवाईची माहिती मिळू शकली नाही.
--
तक्रार आली, तरच कारवाई
बोगस डाॅक्टरांची कोरोनापूर्वी मोहीम राबवून डाॅक्टरांवर कारवाई केली जात होती. मात्र, कोरोना काळात आरोग्य यंत्रणा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत व्यस्त असल्याने केवळ तक्रारी आल्या तिथेच तपासणी करून, कारवाई करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
---
सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ
परवानगीशिवाय कोरोनाचे उपचार
१. कोरोना काळात ग्रामीण भागात कोरोना उपचाराची परवानगी नसताना कोरोनाचे उपचार केले गेले. त्यानंतर, रुग्ण गंभीर झाल्यावर घाटी, जिल्हा रुग्णालयांत पाठवण्यात आले. कोरोना तपासणीशिवाय कोरोनावर वेगवेगळे उपचार केल्याने रुग्ण गंभीर होऊन शेवटच्या क्षणी रुग्णालयात आल्याचे प्रमाण ८ टक्के असल्याचे नुकतेच ग्रामीण भागातील डेथ ऑडिटमधून समोर आले आहे.
---
तपासणीशिवाय गृहविलगीकरणाचे पॅकेज
--
२ सिडको परिसरात फॅमिली डाॅक्टर म्हणून सेवा देणाऱ्या डाॅक्टरांकडून लक्षणांवरून कोरोना असल्याचे सांगून रुग्णांना गृहविलगीकरणात उपचाराचे पॅकेज दिले. त्यातील काही जणांना गंभीर झाल्याने रुग्णालयात भरती व्हावे लागले. मात्र, तपासणी केली नसल्याने त्यांना कोरोना असल्याचे प्रमाणपत्र न मिळाल्याने शासकीय सुट्ट्यांसह पुन्हा रुजू होण्यात, परिपूर्तीच्या बिलांतही अडचणींना सामोरे जावे लागले.
---
कोरोनाचा हमखास इलाज
३ लक्षणे नसलेली अनेक रुग्ण कोणत्याही उपचाराशिवाय तपासणीशिवाय बरेही झाले. याचा फायदा घेत बोगस डाॅक्टरांकडून हमखास बरे करण्याची हमी देवून बोगस औषधोपचारातून बरे करून पैसे उकळले. ते रुग्ण बरेही झाल्याचे अनेक उदाहरणे कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर तज्ज्ञ डाॅक्टरांसमोर आली. असे जीवाशी खेळणाऱ्या बोगस डाॅक्टरांवर कारवाई करण्यासाठी आरोग्य विभागाने मोहीम राबविण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
--
४
जिल्ह्यात बोगस डाॅक्टरांवर कारवाई
............
२
विना परवाना सुरू असलेल्या रुग्णालयांवर कारवाई
---
तालुकानिहाय बोगस डाॅक्टर
वैजापूर -१
खुलताबाद -१
औरंगाबाद -१
औरंगाबाद शहर -१
---