मृत पत्नीबद्दल अपशब्द वापरल्यामुळे केली हत्या

By Admin | Published: May 26, 2016 12:02 AM2016-05-26T00:02:11+5:302016-05-26T00:06:18+5:30

औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी बीड बायपास परिसरातील सहारा सिटी प्रकल्पासमोर दत्ता डिघुळे (३१, रा. अरिहंतनगर) या तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली.

Murder caused due to abuse of dead wife | मृत पत्नीबद्दल अपशब्द वापरल्यामुळे केली हत्या

मृत पत्नीबद्दल अपशब्द वापरल्यामुळे केली हत्या

googlenewsNext

औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी बीड बायपास परिसरातील सहारा सिटी प्रकल्पासमोर दत्ता डिघुळे (३१, रा. अरिहंतनगर) या तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येचा उलगडा करण्यात गुन्हे शाखा आणि एमआयडीसी सिडको पोलिसांना एकत्रितपणे बुधवारी यश आले. सहा महिन्यांपूर्वी वारलेल्या पत्नीबद्दल अपशब्द वापरल्यामुळे आरोपी मनजित कुलदीपसिंग पन्नू (२७, रा. गजानन महाराज मंदिर परिसर) याने साथीदार महेश ऊर्फ बट्टी उत्तमराव बनकर (२६, रा. हरिओमनगर, गारखेडा)याच्या मदतीने दत्ताची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, बीड बायपास परिसरातील सहारा सिटी गृहप्रकल्पा समोरील पडीक जमिनीवर सोमवारी सकाळी दत्ता डिघुळे याचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळला होता. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचा तपास गुन्हे शाखेच्या विविध पथकाने आणि एमआयडीसी सिडको पोलिसांनी सुरू केला.
मृताचे मनजित पन्नू, महेश ऊर्फ बट्टी यांच्यासह उठणे बसणे होते. ते आकाशवाणी चौकातील एका पानटपरीवर गप्पा मारत बसत असत. रविवारी मित्रासोबत कंदुरीचे जेवण करून दत्ता रात्री ८ वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकातील टपरीवर आला.
याप्रसंगी बोलता बोलता दत्ता सतत मनजित यास त्याच्या मृत पत्नीवरून टोमणे मारत होता. याप्रसंगी त्याने पत्नीविषयी अपशब्द वापरल्याने मनजितला त्याचा राग आला. त्यास कायमचा धडा शिकविण्याचे त्याने मनोमन ठरविले. त्यानंतर तो दत्ता यास बीअर पाजतो असे म्हणून स्वत:च्या दुचाकीवर बसून बीड बायपासच्या दिशेने घेऊन गेला. तत्पूर्वी त्याने त्याचा मित्र आरोपी महेश ऊर्फ बट्टी याच्या मोबाईलवर संपर्क साधून दत्ताला धडा शिकवायचा आहे, असे म्हणून त्यास बायपासवरील सूर्या लॉन्ससमोर येण्यास सांगितले. त्यामुळे महेश सूर्या लॉन्ससमोर उभा होता. दुचाकीवर डबल सीट असलेल्या मनजित आणि दत्ताच्या मागे सूर्या लॉन्ससमोरून महेश बसला. त्यानंतर ते तेथून घटनास्थळी गेले.
आरोपी टॅक्सीचालक, केटरर्सचे काम करणारे
आरोपी मनजित हा टॅक्सीचालक आहे. तर महेश हा केटरर्सचे काम करतो. दत्ताची हत्या केल्यानंतर तो सोलापूर येथे टॅक्सी भाडे घेऊन निघून गेला. तत्पूर्वी त्याचे रक्ताने माखलेले कपडे त्याच्या भाच्याने जाळून टाकले. पोलिसांनी त्याचा मित्र आणि गाडीमालकाकडून मनजित सोलापूरहून कधी येणार आहे, याबाबत माहिती घेतली. तो बुधवारी पहाटे शहरात येताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. मनीष कल्याणकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघ, मधुकर शिंदे, सहायक फौजदार आरेफ शेख, कर्मचारी भीमराव आरके, मनोज चव्हाण, संजय खोसरे, संतोष सूर्यवंशी, मुक्तेश्वर लाड, सतीश जाधव, राम हातरगे यांनी त्यास पकडले. त्यानंतर महेशला अटक केली.

त्याच्या कुटुंबाने आपल्याला मारले असते
दत्ताला जिवंत मारण्याऐवजी त्याचे हात-पाय तोडून त्यास सोडून का दिले नाही, असे पोलिसांनी मनजितला विचारले असता तो म्हणाला की, दत्ता आणि त्याचे भाऊ दादागिरी करणारे लोक आहेत. दत्ताचे हात-पाय तोडून त्यास सोडले असते तर त्याच्या नातलगांनी आपल्याला मारून टाकले असते. त्यामुळे भीतीपोटी त्याची हत्या केल्याची कबुली दिली.
प्रथम डोक्यात बीअरच्या बाटल्या फोडल्या...
दत्ता मद्य प्राशन केलेला असूनही त्याचे स्वत:वर पूर्ण नियंत्रण होते. बीड बायपासपासून रस्त्यावरून उत्तरेकडे कच्च्या रस्त्यावर दुचाकी उभी केल्यानंतर दुचाकीवरून उतरताच मनजितने दत्ताला मारहाण करण्यास सुरुवात केली.
घटनास्थळी बीअरच्या अनेक रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या. महेशने बीअरच्या दोन बाटल्या दत्ताच्या डोक्यात मारल्या. त्यामुळे तो खाली पडला. यानंतर दोन्ही आरोपींनी त्याला दगडाने आणि सिमेंटच्या खांबाने डोके ठेचले.

Web Title: Murder caused due to abuse of dead wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.