पैठण शहरात कुल्फी विक्रेत्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:02 AM2021-05-24T04:02:21+5:302021-05-24T04:02:21+5:30
पैठण : शहरातील फकीरवाडा भागातील परप्रांतीय कुल्फी विक्रेत्याचा शेजाऱ्याने डोक्यात हातोड्याने घाव घालून खून केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. ...
पैठण : शहरातील फकीरवाडा भागातील परप्रांतीय कुल्फी विक्रेत्याचा शेजाऱ्याने डोक्यात हातोड्याने घाव घालून खून केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. किरकोळ वादातून ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मायाशंकर प्रजापती (४२) असे मयत कुल्फी विक्रेत्याचे नाव आहे, या प्रकरणातील संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
उत्तर प्रदेश (जि. जौनपूर) येथील रहिवासी असलेले मायाशंकर प्रजापती हे गेल्या २० वर्षांपासून पैठण शहरात कुल्फी विक्री करून उदरनिर्वाह करत होते. पै पै जमवून शहरातील फकीरवाडा भागात त्यांनी घर विकत घेतले होते. करीम शहा (३५) हा बांधकाम मजूर मायाशंकर प्रजापती यांच्या शेजारी राहतो. दरम्यान, घराच्या गल्लीत कुल्फीची हातगाडी लावण्यावरून दोन्ही परिवारात गेल्या काही दिवसांपासून किरकोळ वाद सुरू होता. रविवारी सकाळी याच कारणावरून मायाशंकर प्रजापती आणि करीम शहा यांच्यात वादावादी झाली, पण शेजाऱ्यांनी वाद मिटवल्याने प्रकरण थांबले होते. यानंतर कुल्फीच्या गाडीत मायाशंकर प्रजापती सामान भरत असताना अचानक करीम शहा याने घरातून बांधकामाचा हातोडा आणून प्रजापती यांच्यावर हल्ला केला. डोक्यात हातोड्याने घाव घातल्याने प्रजापती जागेवरच कोसळले. परिसरातील नागरिकांनी तातडीने गंभीर जखमी झालेल्या प्रजापती यांना पैठणच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पुढील उपचारासाठी औरंगाबादला घेऊन जात असताना रस्त्यात प्रजापती यांची प्राणज्योत मावळली.
--- आरोपी पोलिसांच्या ताब्यात ------
मयत मायाशंकर प्रजापती यांची पत्नी सुनीता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी करीम शहा याच्या विरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी घटनेनंतर फरार झाला होता. पोलीस निरीक्षक किशोर पवार, फौजदार रामकृष्ण सागडे, छोटूसिंग गिरासे, जमादार सुधीर वाव्हळ यांनी संशयित आरोपी करीम शहा यास पैठण शेवगाव रोडने शहागडकडे पळून जात असताना अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.
---- संशयित आरोपी करीम शहा
230521\img_20210523_163920.jpg
आरोपी करीम शहा