घरगुती वादातून पुतण्यानेच केला चुलत्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 11:25 PM2019-05-05T23:25:39+5:302019-05-05T23:25:58+5:30
औरंगाबाद : घरगुती कारणातून पुतण्यानेच चुलत्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून भरचौकात निर्घृण खून केल्याची घटना रविवारी (दि.५) सायंकाळी ...
औरंगाबाद : घरगुती कारणातून पुतण्यानेच चुलत्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून भरचौकात निर्घृण खून केल्याची घटना रविवारी (दि.५) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास देवळाई चौकातील एका फुटवेअर दुकानासमोर घडली. या कृत्यानंतर रिक्षाचालक पुतण्या फरार झाला असून, पुंडलिकनगर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.
शेख सत्तार शेख सांडू (३६,रा. देवळाई) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेख अलीम शेख बुढण (२२, रा. बीड बायपास परिसर) असे आरोपीचे नाव आहे. शेख सत्तार आणि आरोपी हे नात्याने चुलते पुतणे आहेत. शेख सत्तार हे त्यांच्या नातेवाईकांसोबत बांधकाम कंत्राटदार म्हणून काम करीत. देवळाई येथे ते पत्नी, मोठी मुलगी रुकाया, मुलगा अयान (१२), बबलू (१०) यांच्यासह राहत. चार भावांमध्ये शेख सत्तार हे धाकटे होते. त्यांच्या मोठ्या भावाचे अपघाती निधन झालेले असून, अन्य दोन भाऊ, भावजयी आणि पुतणे हे त्यांच्या शेजारीच गावात राहतात. सत्तार यांचा सर्व कुटुंबात दबदबा होता. अलीम हा त्यांचा लाडका पुतण्या होता. कुटुंबातील कोणतीही अडचण, संकटप्रसंगी सत्तार हे धावून जात आणि प्रश्न सोडवीत. यामुळे सत्तार यांचा शब्द कोणीही टाळत नसत. अलीमचे वर्षभरापूर्वी लग्न झाले. दीड ते दोन महिन्यापूर्वी तो पत्नीला घेऊन बायपास परिसरात घर भाड्याने घेऊन वेगळा राहू लागला. अलीमचे वेगळे राहणे हे त्याच्या आई-वडिलांना आणि सत्तार यांना पटले नव्हते. यामुळे त्यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, रविवार असल्याने सत्तार हे कामावर गेले नव्हते. अलीम हा रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो, मात्र तो रागीट स्वभावाचा होता आणि सहसा तो कोणाचेही ऐकत नव्हता. सत्तार हे रविवारी सायंकाळी देवळाई चौकात असताना आरोपी अलीम हा रिक्षा घेऊन स्टँडवर आला. त्यावेळी त्याने सत्तार यांना पाहिले. सत्तार हे पोलीस चौकीसमोरील एका फुटवेअर दुकानासमोर असताना, अलीम अचानक त्यांच्याजवळ गेला. यावेळी त्यांच्यात काहीतरी कारणावरून वाद झाला. या वादातच अलीमने कमरेला लपवून ठेवलेले धारदार शस्त्र बाहेर काढले आणि सत्तार यांच्या पोटावर, जांघेत आणि अन्यत्र सपासप वार करून गंभीर जखमी केले. या घटनेनंतर अलीम पळून जात असताना गंभीर स्थितीतही सत्तार त्याच्यामागे दगड घेऊन लागले. मात्र ते तेथेच कोसळले.
(जोड आहे)
सत्तार यांना नातेवाईकांनी केले रुग्णालयात दाखल
ही घटना घडली तेव्हा देवळाई चौकात शेख सत्तार यांचे अनेक नातेवाईक आणि रिक्षाचालक बसलेले होते. यावेळी ते मदतीला धावले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सत्तार यांना रिक्षातून तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. अपघात विभागातील डॉक्टरांनी सत्तार यांना तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
अर्ध्या तासापूर्वी अलीमच्या मामासोबत घेतला चहा
घटनेच्या अर्ध्या तासापूर्वी शिवाजीनगर येथून देवळाईकडे जाणाऱ्या अलीमचे मामा शेख निसार शेख असिफ यांना आवाज देऊन शेख सत्तार यांनी थांबविले. यानंतर त्यांनी तेथील एका हॉटेलवर सोबत चहा घेतला. यानंतर निसार हे देवळाईकडे तर सत्तार हे देवळाई चौकाकडे गेले. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर अलीम आणि शेख सत्तार यांच्यात भेट झाली आणि ही खुनाची घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेख सत्तार हे आरोपी अलीमपेक्षा शरीरयष्टीने बलदंड होते. नेहमीप्रमाणे चुलता या नात्याने अलीमला काहीतरी सांगत होते. यावेळी बेसावध सत्तार यांच्यावर अलीमने अचानक धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना ठार केले.
पुंडलिकनगर पोलिसांकडून घटनेचा पंचनामा
पुंडलिकनगर ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आरोपी अलीमचा शोध सुरू केला. शेख सत्तार यांची हत्या घरगुती कारणावरून झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे सपोनि. सोनवणे यांनी सांगितले. आरोपी अलीम पसार झाला असून, त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला.