'मुलीची आत्महत्या नव्हे घातपात'; तपासाला वेग देण्याच्या ग्वाहीनंतर पालकांनी स्वीकारला मृतदेह
By योगेश पायघन | Published: August 27, 2022 05:42 PM2022-08-27T17:42:44+5:302022-08-27T17:51:02+5:30
देवगिरी काॅलेज विद्यार्थीनी आत्महत्या प्रकरण, भावाने सांगितले तिला तिला हॉस्टेलवर त्रास होता
औरंगाबाद: देवगीरी महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहात आरती सर्जेराव कोल्हे (२०, रा. गुरुपींप्री, ता. घनसावंगी, जि. जालना) या बी काॅमच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केली. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. वेदांतनगर पोलीसांनी जलद तपासाची ग्वाही दिल्यावर अखेर दुपारी तीन वाजेच्या सुमारास पालकांनी मृतदेह स्विकारून गावाकडे अंत्यसंस्कारासाठी रवाना झाले.
देवगिरी महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात तिसऱ्या मजल्यावर रूम नंबर ४४ मध्ये शुक्रवारी घडलेल्या घटनेसंदर्भात आरतीचा भाऊ गणेश कोल्हे म्हणाला, पोळ्याला पुण्याहून आरतीला भेटीसाठी आलो होतो. आज गावाहून येवून औरंगाबादला तिला भेटणार होतो. मात्र, शेवटची भेट अशी झाली. आरतीच्या रूममधील एका मुलीची तक्रार तीने वाॅर्डनकडे केल्याचे २ दिवसांपुर्वी सांगितले होते. त्या तक्रारीचे काय झाले. देवगिरी महाविद्यालय, वसतीगृह का सहकार्य करत नाहीये, असा सवाल त्याने उपस्थित केला. तसेच आरतीच्या चिठ्ठीवरील मजकूराच्या हस्ताक्षराबद्दल संशय असून त्याचाही तपास व्हावा, अशी मागणी भावाने केली.
वडील सर्जेराव कोल्हे यांनी आरतीची आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करून सखोल तपास करून सत्य बाहेर आणण्याची मागणी केली. वेदांतनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक व तपास अधिकारी सचिन सावंत म्हणाले, आरतीने कोणत्या कारणाने आत्महत्या केली. त्या दृष्टीने तांत्रीक दृष्टीने तपास करत आहोत. नातेवाईकांनाही तपासाला वेळ द्या. असे म्हणून त्यांची समजूत काढल्याने ते मृतदेह ताब्यात घेण्यास तयार झाले आहेत.
तोपर्यंत स्विकारण्यास दिला नकार...
कुटुंबिय व नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर घातपाताचा संशय व्यक्त करून गुन्हा नोंदवेपर्यंत मृतदेह न स्विकारण्याची भूमिका घेतली. पोलीसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पथकही घाटीत पोहचले. नातेवाईकांनी वेदांतनगर पोलीस ठाणे गाठून देवगिरी महाविद्यालयासमोर ठिय्या देण्याचा आग्रह धरला. पोलीसांनी सखोल तपासाची ग्वाही दिल्यावर मृतदेह स्विकारून कुटुंबिय व नातेवाईक गावी परतले. शोककळा पसरलेल्या गुरूपींप्री येथे आरतीच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.