बोलणे बंद केल्याने मैत्रिणीची हत्या, मृतदेह घरात पुरला; तीन बायकांनी सोडलेल्या तरुणाचे कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 15:54 IST2025-02-19T15:54:09+5:302025-02-19T15:54:38+5:30
तीन बायकांनी सोडल्यानंतर मैत्रिणीनेही बोलणे बंद केले; संतापलेल्या तरुणाने मैत्रिणीस कायमचे संपवले

बोलणे बंद केल्याने मैत्रिणीची हत्या, मृतदेह घरात पुरला; तीन बायकांनी सोडलेल्या तरुणाचे कृत्य
लासूर स्टेशन ( लातूर) : येथे ६ फेब्रुवारीला खून झालेल्या मोनिका मार्कस झांबरे या परिचारिकेचा मृतदेह पोलिसांनी एका घरातून १४ फेब्रुवारीला बाहेर काढला. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या इरफान शेख या आरोपीने खुनाची कबुली दिली असून, मैत्री झाल्यानंतर बोलणे टाळत असल्याने मोनिकाचा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
जालना येथील मोनिका झांबरे या परिचारिकेचा मृतदेह लासूर स्टेशन परिसरातील एका शेतातील घरातून पोलिसांनी सहा दिवसांनंतर उकरून काढला. याप्रकरणी अटक असलेल्या आरोपी इरफान शेख याने तिचा खून केल्याची कबुली दिली असून, त्याने खून करण्याचे कारण पोलिसांना सांगितले. छ. संभाजीनगर येथील सादातनगर मनपा दवाखान्यात परिचारिका म्हणून कार्यरत मोनिका हिचा विवाह येथील सुमीत निर्मळ याच्याशी झाला होता. पतीसोबत वाद झाल्याने ती माहेरी जालना येथे राहत होती. तेथून रेल्वेने संभाजीनगरला दवाखान्यात अपडाऊन करायची. रेल्वेस्टेशनवरील पार्किंगमध्ये ती स्कुटी उभी करीत असल्याने तिची तेथे काम करणाऱ्या इरफान शेखसोबत मैत्री झाली.
इरफानचे यापूर्वी तीन लग्न झाले होते व तिन्ही पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हत्या. मोनिका व इरफान हे दोघे नंतर मोबाईलवर बोलू लागले. इरफानने यापूर्वी तिचा पतीसोबत समेट घडविण्याचाही प्रयत्न केला होता. कालांतराने मोनिका इरफानला बोलणे टाळू लागली. तिचा फोन नेहमी बिझी यायचा, यामुळे इरफान चिडला होता. त्यातच तिला संपवायचे त्याने ठरविले. त्यानंतर त्याने मोनिकाला लासूर स्टेशन येथे भेटायला तयार केले. तत्पूर्वी त्याने शेतातील घरात एक सहा फूट खोल खड्डा खाेदून घेतला होता. मोनिका ६ फेब्रुवारीला त्याच्यासोबत तेथे गेल्यानंतर इरफानने प्रथम तुला गंमत दाखवितो म्हणून तिचे हात पाय बांधले व नंतर तिचा गळा आवळून खून केला. तसेच तिच्या अंगावरील सर्व कपडे काढून जाळून टाकले. दागिने काढून घेतले व खड्ड्यांत पुरून टाकल्याची माहिती शिल्लेगाव ठाण्याचे पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांनी दिली.
मोबाईलवरून नातेवाइकांना केले मेसेज
मोनिकाला ठार मारल्यानंतर इरफानने तिच्या मोबाईलवरून तिच्या नातेवाइकांना मेसेज करून मला शोधू नका, मी दुसरे लग्न केले असल्याचे सांगितले. मात्र कुटुंबीय तिला कॉल करायचे तेव्हा फोन उचलला जात नव्हता. इरफानने तिचे दागिने लासूर स्टेशन येथील एका सोनाराला विकले व बॅग छ. संभाजीनगरमधील एका नाल्यात फेकून दिली. फोन उचलला जात नसल्याने नातेवाइकांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपी इरफानच्या मुसक्या आवळल्या.