सिगारेट, गुटख्याची दोनशे रुपयांची उधारी मागितल्याने टपरीचालकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 07:35 PM2022-06-22T19:35:05+5:302022-06-22T19:35:58+5:30

क्रांती चौक पोलिसांनी तिन्ही आरोपींना ठोकल्या बेड्या

Murder of pan shop owner for asking for a credit of Rs. 200 for cigarettes and gutkha | सिगारेट, गुटख्याची दोनशे रुपयांची उधारी मागितल्याने टपरीचालकाचा खून

सिगारेट, गुटख्याची दोनशे रुपयांची उधारी मागितल्याने टपरीचालकाचा खून

googlenewsNext

औरंगाबाद : दलालवाडी येथील एका अर्धवट बांधकामाच्या जागेत टपरीचालक रिजवान उल हक इम्रान उल हक (३२, रा.सिल्लेखाना) चा दलालवाडी येथे सोमवारी रात्री झालेला निर्घृण खून हा केवळ २०० रुपयांच्या उधारीवरून झाल्याचे निष्पन्न झाले. या टपरीचालकाने सिगारेट, गुटख्याच्या पुड्याची उधारी मागितल्याने काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. तडजोड करण्याच्या बहाण्याने बोलावून रिजवानसह त्याच्या मित्रावर चाकूने सपासप वार करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.

मोहसीन ऊर्फ हमला रमजानी कुरेशी (रा.दलालवाडी), पाशा सय्यद (रा. हुसेन कॉलनी) आणि कन्हैय्या गोनेला (रा. दलालवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींना न्यायालयाने २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे म्हणाले की, मृत रिजवान आणि आरोपी मोहसीन हे परस्परांचे मित्र होते. रिजवान हा महावीर चौक परिसरात पानटपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. काही महिन्यांपासून मोहसीन हा साथीदारांसह रिजवानच्या टपरीवर जाऊन सिगारेट, गुटख्यासह अन्य वस्तू घेई. मात्र तो पैसे देत नव्हता. रिजवानने पैशांची मागणी केल्यानंतर तो आणि त्याचे साथीदार त्याला जिवे मारण्याची धमकी द्यायचे. रिजवानचा भाऊ सलमानलाही त्याने धमकी दिली होती. एका मारहाणीच्या प्रकरणात मोहसीनविरोधात गुन्हा नोंद झाला होता. त्यात रिजवान साक्षीदार होता. त्याचाही राग आरोपींना होता. सोमवारी रात्री आपसांत तडजोड करण्याच्या बहाण्याने सर्वजण दलालवाडी येथे एकत्र जमले तेथे मद्यप्राशनानंतर मोहसीनने रिजवानचा चाकूने भोसकून खून केल्याचे आणि यावेळी मध्यस्थी करणाऱ्या वसीम कुरेशीवर प्राणघातक हल्ला केल्याचे पोलीस तपासात समोर आले. याप्रकरणी मृताचे वडील इम्रानुलहक ऐनुलहक (रा. चंपा चौक) यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरा आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

गुन्हे शाखा आणि क्रांती चौक पोलिसांनी पकडले आरोपींना
खून करून पसार झालेल्या तिन्ही आरोपींना गुन्हे शाखा आणि क्रांती चौक पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या काही तासांत अटक केली. सर्व आरोपींना क्रांती चौक पोलिसांनी मंगळवारी कडक बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. आरोपींची ७ दिवस पोलीस कोठडी पोलिसांनी न्यायालयाकडे मागितली. न्यायालयाने तिन्ही आरोपींना २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार रिजवान विरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये घरात घुसून लुटमार, जिन्सी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा, ऐवज हिसकावणे, क्रांती चौक ठाण्यात २०१५ साली मारहाण, जिवे मारण्याची धमकी, तर २०२२ मध्ये मारहाण करून गंभीर दुखापत, मारहाण, जिवे मारण्याची धमकी इ. कलमांनुसार गुन्हे आहेत.मोहसीनविरोधात क्रांती चौक ठाण्यात २००९ साली मारहाण करून गंभीर दुखापत, जिवे मारण्याची धमकी, २०११ साली चाेरी, तर २०१२ मध्ये तडिपारीच्या आदेशाचे उल्लंघन अशा तीन गुन्ह्यांची नोंद आहे. जखमी वसीम कुरेशी मुख्तार कुरेशी याच्यावरही क्रांती चौक ठाण्यात मारहाण करून गंभीर दुखापत करण्याचा गुन्हा नोंद आहे.

Web Title: Murder of pan shop owner for asking for a credit of Rs. 200 for cigarettes and gutkha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.