कार हळू चालव म्हटले म्हणून मारहाणीत एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:02 AM2021-08-28T04:02:16+5:302021-08-28T04:02:16+5:30
सिल्लोड (जि. औरंगाबाद) : घराशेजारून भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारने कट मारला. यामुळे घाबरलेल्या व्यक्तीने ‘कार हळू चालव’, म्हणून ...
सिल्लोड (जि. औरंगाबाद) : घराशेजारून भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारने कट मारला. यामुळे घाबरलेल्या व्यक्तीने ‘कार हळू चालव’, म्हणून चालकाला समज दिली. याचा राग मनात धरुन नंतर संबंधित कारचालक व त्याच्या भावांनी हल्ला करुन लाथा, बुक्क्या व लाकडाने मारहाण करीत सदर व्यक्तीचा खून केला. ही घटना अजिंठ्यात गुरुवारी मध्यरात्री घडली. मोहंमद शफीयोद्दीन अब्दुल रहेमान (५०) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी अजिंठा पोलिसांनी तिघाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे जामा मस्जिदजवळ भागात मोहंमद शफीयोद्दीन अब्दुल रहेमान हे गुरुवारी मध्यरात्री उभे होते. त्यावेळी त्यांच्या घरासमोरुन एक कार भरधाव वेगाने येऊन त्यांना कट मारला. यामुळे घाबरलेल्या मोहंमद शफियोद्दिन यांनी कारचालक सादिक ऊर्फ मुन्नाजान मोहंमद शेख याला ‘कार हळू चालव, मारतो का’, असे म्हटले. याचा राग येऊन कारचालक सादिकने त्यांच्यासोबत वाद घातला. यामध्ये काही लोकांनी मध्यस्थी करुन संबंधित वाद मिटविला. यानंतर सादिक घरी गेला व त्याने घरच्यांना ही माहिती दिली.
यानंतर रागात आलेले कारचालकाचे भाऊ आणि नातेवाईक शेख जावेदजान, मोहंमद शेख, अथर शेख हे पुन्हा घटनास्थळी आले. त्यांनी शफीयोद्दीन यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. यावेळी चालक सादिकने हातातील लाकडी दांडा शफीयोद्दीन यांच्या डोक्यात टाकला. यामुळे शफीयोद्दीन रक्तबंबाळ होऊन खाली कोसळले. काही नागरिकांनी त्यांना तात्काळ अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने प्रथमोपचारानंतर त्यांना औरंगाबादला हलविण्याचे डाॅक्टरांनी सांगितले. औरंगाबादला नेत असतानाच रस्त्यातच शफीयोद्दिन यांचा मृत्यू झाला.
-------
मयताचा मुलगा शेख मोहंमद शोफियान मोहम्मद शफीयोद्दीन याने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सादिक ऊर्फ मुन्नाजान मोहंमद(२८), शेख जावेदजान मोहंमद शेख(३२), शेख अथर जाफर बेग (३८) या तीन आरोपिंविरोधात अजिंठा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सपोनि. अजित विसपुते, फौजदार राजू राठोड, अक्रम पठाण, राजू बरडे, रविकिरण भारती, हेमराज मिरी, अरुण गाडेकर यांनी आरोपींना अटक केली आहे.
फोटो :
270821\img_20210827_160200.jpg
क्याप्शन
मयत
मोहंमद शफीयोद्दीन अब्दुल रहेमान यांचा पासपोर्ट फोटो