दारूच्या नशेत पाठीवर मारली थाप; जाब विचारताच रागातून केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 11:37 AM2021-03-15T11:37:12+5:302021-03-15T11:47:46+5:30

घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण चव्हाण याचा मृत्यू झाला.

Murder by stabbing a drunken laborer in the stomach; The wife's manipulation to save the accused husband | दारूच्या नशेत पाठीवर मारली थाप; जाब विचारताच रागातून केली हत्या

दारूच्या नशेत पाठीवर मारली थाप; जाब विचारताच रागातून केली हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देमिटमीटा तलावाजवळील घटना दारूच्या नशेत मजुराच्या पोटात चाकू खुपसून खूनआरोपी पतीस वाचविण्यासाठी पत्नीची बनवेगिरी

औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरून उद्‌भवलेल्या भांडणात एकाने दारूच्या नशेत मजुराच्या पोटात चाकूचा वार करून त्याला गंभीर जखमी केले. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना अवघ्या दोन तासांत त्या मजुराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. १३) सकाळी मिटमीटा तलावाजवळील वस्तीवर घडली.

लक्ष्मण रघुनाथ चव्हाण (वय ३०) असे मृत मजुराचे नाव आहे, तर संजू काळे व त्याची पत्नी उषा संजू काळे, अशी आरोपींची नावे आहेत. मिटमिटा तलावाजवळ पारधी समाजाच्या वस्तीवर लक्ष्मण चव्हाण हा मजूर कुटुंबासोबत राहत होता. लक्ष्मण हा मूळ अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे. शनिवारी सकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण चव्हाण, संजू काळे, श्रीमंत काळे, क्रांती शिंदे हे तेथे ओट्यावर दारू पीत बसले होते. दारू जास्त झाल्यामुळे लक्ष्मण चव्हाण हा मध्येच उठून घराकडे निघाला. तेव्हा संजू काळे याने लक्ष्मणच्या पाठीवर थाप मारून त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लक्ष्मणने पाठीवर थाप मारल्याचा जाब विचारला. त्यावर ‘तू मला जाब विचारतोस, थांब तुला दाखवतो,’ असे म्हणत संजू रागाच्या भरात घरी गेला. त्याने घरातून चाकू आणला आणि लक्ष्मणच्या पोटात खुपसला. भांडण सोडवण्यासाठी लक्ष्मणचा लहान भाऊ भिसन चव्हाण तेथे गेला. तेव्हा संजू काळे याने त्याच्या हातावर चाकूचा वार करून जखमी केले. लक्ष्मणच्या पोटातून खूप रक्तस्राव होऊ लागल्याने आरडाओरड सुरू झाली व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

लोक जमा होऊ लागल्याचे पाहून मारेकरी संजू काळेची पत्नी उषा संजू काळे, लक्ष्मणचा साला देवानंद चव्हाण, शिवराव भोसले या तिघांनी लक्ष्मणला जखमी अवस्थेत मोटारसायकलवर बसवून घाटीत नेले. भिसन चव्हाणच्या हातातून रक्त वाहत असल्याने थेट घाटीत न जाता त्याने पडेगाव येथील खासगी रुग्णालयात जाऊन हातावर उपचार करून घेतले. दरम्यान, घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण चव्हाण याचा मृत्यू झाला. या प्रकरणी भिसन चव्हाण याने दिलेल्या तक्रारीवरून संजू काळे व उषा काळे यांच्याविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग भागिले करीत आहेत. भागिले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या शोधार्थ तीन पथके रवाना करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा आरोपी संजू काळे याने घर उघडे सोडून पत्नीसह पळ काढल्याचे निदर्शनास आले. मारेकरी संजू काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याचे उपनिरीक्षक पांडुरंग भागिले यांनी सांगितले.

पतीला वाचविण्यासाठी पत्नीची बनवेगिरी
उषा काळेने लक्ष्मणला नातेवाइकांच्या मदतीने घाटीत दाखल केले. तिने पती संजू यास वाचविण्यासाठी घाटीत स्वत:चे नाव पूजा यश काळे असे सांगितले, तर लक्ष्मणचे खरे नाव न सांगता लक्ष्मण बारकू काळे असे सांगितले. राहत्या घरी लक्ष्मण हा टोकदार वस्तूवर पडून जखमी झाला असल्याची खोटी नोंद केली. उपचार सुरू असताना लक्ष्मण मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच उषाने घाटीतून धूम ठोकली. जेव्हा मृत लक्ष्मणची पत्नी आणि भाऊ भिसन हे दोघे घाटीत पोहोचले तेव्हा खरी घटना उघडकीस आली.

Web Title: Murder by stabbing a drunken laborer in the stomach; The wife's manipulation to save the accused husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.