लग्नानंतर दोनच वर्षांत विवाहितेचा गळा दाबून खून; पतीची जन्मठेप कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:04 AM2021-09-18T04:04:47+5:302021-09-18T04:04:47+5:30
औरंगाबाद : लग्नानंतर दोनच वर्षांत पत्नी सुनीताचा गळा दाबून खून केल्याच्या गुन्ह्यात अहमदनगरच्या सत्र न्यायालयाने तिचा पती अच्युत बास्कर ...
औरंगाबाद : लग्नानंतर दोनच वर्षांत पत्नी सुनीताचा गळा दाबून खून केल्याच्या गुन्ह्यात अहमदनगरच्या सत्र न्यायालयाने तिचा पती अच्युत बास्कर काळे याला ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी कायम केली.
तसेच सत्र न्यायालयाच्या आदेशात दुरुस्ती करत खंडपीठाने केवळ ६ महिने शिक्षा ठोठावलेल्या विवाहितेची सासू शकुंतला, सासरे भास्कर आणि नणंद सत्यशीला भोसले यांना विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळाच्या आरोपाखाली प्रत्येकी १० वर्षे सश्रम सश्रम कारावासाची शिक्षा आणि एक हजार रुपये दंड ठोठावला. हे तिघे आतापर्यंत जामिनावर होते. त्यांनी सत्र न्यायालयात हजर व्हावे. न्यायालयाने वरीलप्रमाणे शिक्षेचे वॉरंट जारी करावे, असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.
अच्युत भास्कर काळे (२६) याचे सुनीतासोबत लग्न झाल्यानंतर वर्षभरात त्यांच्यात वाद सुरू झाले. माहेरहून पैसे आणण्याची सतत मागणी करण्यात येऊ लागली. तिने पैसे न आणल्यामुळे तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. हुंड्यासाठी सुनीताचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात पती अच्युत, सासू शकुंतला, सासरे भास्कर व नणंद सत्यशीला भोसले यांच्यावर भादंविच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नगर सत्र न्यायलयाने पती अच्युतला जन्मठेपेची, तर इतरांना केवळ सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात पती अच्युतने खंडपीठात अपिल दाखल केले होते, तर इतर तिघांविरोधात शासनाने शिक्षा वाढीसाठी अपिल दाखल केले होते. हुंडाबळी कायदानुसार शिक्षा देण्यात आली होती; परंतु ३०४ (ब) मध्ये नगरच्या सत्र न्यायालयाने पुरावे ग्राह्य धरले. मात्र, शिक्षा सुनावली नसल्याचा युक्तिवाद सहायक सरकारी वकील प्रीती डिग्गीकर यांनी खंडपीठात केला. मयताला त्रास देण्यात तिघांची भूमिका सारखी असल्याचे त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. सुनावणीअंती खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.