गुटखा पुडी न दिल्याने तरूणाचा खून; दोन जणांना गुन्हेशाखेकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 06:22 PM2019-09-26T18:22:19+5:302019-09-26T18:27:30+5:30
आरोपींनी मृतदेह गोगाबाबा टेकडी परिसरात फेकून दिला होता.
औरंगाबाद: नवविवाहित तरूणाच्या खूनाचा उलगडा करण्यात गुन्हेशाखेला गुरूवारी यश आले. गुटखा पुडी न दिल्याने तडीपार गुंडाने साथीदारांच्या मदतीने निर्जनस्थळी नेऊन बेदम मारहाण करीत गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. नंतर आरोपींनी मृतदेह गोगाबाबा टेकडी परिसरात फेकून दिला होता. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून अन्य एकाचा शोध सुरू आहे.
तडीपार गुंड प्रवीण उर्फ बाली भास्कर भालेराव (२६,) आणि प्रशांत सुरेश साळवे (२३, दोघे रा. रा. जयभीमनगर, टाऊन हॉल परिसर)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरिापीचा तिसरा साथीदार सोमेश अहिरे हा पसार असून त्याचा शोध सुरू आहे. गोगाबाबा टेकडी परिसरात१८ सप्टेंबर रोजी सकाळी शफीकखान रफिक खान (रा. अरब खिडकी, बेगमपुरा)याचा गळा आवळून खून करून मृतदेह फेकल्याचे आढळले होते.
याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. घटनास्थळीही कोणताही पुरावा गुन्हेगारांनी सोडला नव्हता. गुन्हेशाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक विजय जाधव, पोलीस कर्मचारी दीपक ढोणे, शिवा बोर्डे, रमेश भालेराव, सुरेश काळवणे, संदीप बिडकर आणि नितीन धुळे यांच्या पथकाला या खूनात जयभीमनगर येथील तडीपार गुंड बाली उर्फ प्रवीण असल्याची माहिती खबऱ्याने दिली. बाली हा शहरातून तडीपार असताना तो १८ रोजी शहरात आल्याचे निष्पन्न झाले. मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता, बुधवारी रात्री त्याला पोलिसांनी एका ठिकाणाहून उचलले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
असा केला खून
टाऊन हॉल येथील पानटपरीवर गुटखा खाण्यासाठी शफीक आला होता. गुटखा घेऊन तो एका प्रार्थनास्थळाजवळ उभा असताना आरोपी बाली, त्याचे साथीदार प्रशांत आणि सोमेश यांनी त्याला गाठले आणि गुटखा मागितला. शफिकने त्यांना गुटखा देण्यास नकार दिला. याचा प्रचंड राग बाली आणि त्याच्या साथीदारांना आला. त्यांनी शफीकला शिवीगाळ करीत बळजबरीने दुचाकीवर बसविले. एकाच दुचाकीवर चार जण बसून ते घाटी रुग्णालय कॅम्पसमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ घेऊन गेले. तेथे त्यांनी शफिकला मारहाण केली. यावेळी शफिकने आरडाओरड केल्याने रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी येथे भांडण करू नका,असे म्हणाल्याने आरोपींनी त्याला पुन्हा दुचाकीवर बसविले आणि ते त्याला विद्यापीठाकडे नेऊ लागले. दुचाकीवर बसल्यानंतर शफिक ओरडू लागल्याने आरोपींनी चालत्या दुचाकीवर त्याचा गळा आवळून त्याचा खून केला.नंतर मृतदेह गोगाबाबा टेकडीजवळ फेकून आरोपी पसार झाले होते.