कुऱ्हाडीने घाव घालून झोपेतच तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:04 AM2021-05-20T04:04:41+5:302021-05-20T04:04:41+5:30
फुलंब्री : तालुक्यातील बिल्डा येथील एका तरुणाचा झोपेत असताना डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी ...
फुलंब्री : तालुक्यातील बिल्डा येथील एका तरुणाचा झोपेत असताना डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडली. या खुनाचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिसांनी काही संशयितांची चौकशी सुरू केली आहे. संदीप सुदाम चव्हाण(२८) असे मयताचे नाव आहे.
बिल्डा शिवारात गट नं. ११० मध्ये असलेल्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये संदीप चव्हाण मंगळवारी रात्री झोपला होता. मध्यरात्रीला काेण्यातरी अज्ञात इसमाने त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. फुलंब्री पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी पूजा गायकवाड, गुन्हे शाखेचे पोनि. भागवत फुंदे यांनीही घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पोलिसांनी सहा ते सात संशयितांना ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती फुलंब्री ठाण्याचे पोनि. अशोक मुद्दिराज यांनी दिली.
चौकट
लॉकडाऊनमुळे होता घरी
सुदाम चव्हाण याची संदीप व किरण अशी दोन मुले आहेत. मोठा मुलगा मयत संदीप हा एमजीएम रुग्णालयात सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत होता. मात्र लॉकडाऊनमुळे तो घरी होता. त्यांची दोन एकर शेती आहे. सध्या शेतात पीक नसले तरी बैलांच्या सुरक्षेसाठी संदीप हा शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दररोज रात्री झोपायला जात होता. मंगळवारची रात्र त्याच्यासाठी शेवटची ठरली.
फोटो कॅप्शन १) मयत संदीप चव्हाण याचा फोटो
२) संदीप चव्हाणचा खून झाला ते पत्र्याचे शेड.