थट्टामस्करी जीवावर बेतली; मित्रांच्या वादातून तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 01:27 PM2021-04-26T13:27:00+5:302021-04-26T13:37:09+5:30
Murder of friend over argument on joke भांडण सुरू असताना यश जवळ येताच राजने यशच्या पोटात चाकू खुपसला.
औरंगाबाद : महाविद्यालयीन मित्रांत झालेल्या थट्टामस्करीतून २१ वर्षीय तरुणाचा शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पोटात चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना मयूर पार्क भागात घडली. मारेकऱ्याला हर्सूल पोलिसांनी अटक केली. यश सोमेश महेंद्रकर (वय २१, रा. एसबीओए शाळेजवळ, हडको) असे मृत तरुणाचे नाव असून, मारेकरी राज नामदेव जाधव (१९, रा. हर्सूल परिसर) याला अटक करण्यात आली आहे.
श्रीकांत सतीश शिकरे (१९, रा. हिरानगर, मयूर पार्क) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तुळजाभवानी चौकातील बिकानेर मिठाई दुकानासमोर श्रीकांत बसलेला असताना त्याचे मित्र राज जाधव, अथर्व टाकळकर, ओंकार कोलते हे दुचाकीवरून आले. त्यावेळी राज हा श्रीकांतला म्हणाला, यश महेंद्रकर याला मी मारणार आहे. त्यावेळी श्रीकांतने त्याची समजूत काढली. तोच राजने यशला फोन करून तुळजाभवानी चौकात येण्यास सांगितले.
साडेनऊ वाजण्याच्या सुमारास काळ्या रंगाच्या कारमधून तिघेजण जात असताना राजसोबतच्या मित्राने आवाज दिल्याने ती कार मागे परत आली. त्या कारमधून मितील उबाळे, अमेय म्हस्के, पुष्कर भारंबे हे उतरले. त्याचवेळी यश सोमेश महेंद्रकर, विशाल राजू भोसले, प्रफुल्ल बोरसे हे दुचाकीवरून आले. तेव्हा यशच्या अंगावर धावून जाताना राजच्या हातात श्रीकांतला चाकू दिसला. त्याने राजला पकडून बाजूला नेले; परंतु हाताला झटका देत राज हा यशच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी यशही राजला मारण्यासाठी पुढे येत होता. भांडण सुरू असताना यश जवळ येताच राजने यशच्या पोटात चाकू खुपसला. त्यावेळी यशच्या पोटाला जखम होऊन त्यातून रक्त निघू लागले.
विशाल आणि प्रफुल्ल यांनी यशला दुचाकीवर बसवून घेऊन गेले. राज आणि त्याचे मित्रही तेथून निघून गेल्यावर श्रीकांतने विशालकडे चौकशी केली. ते एम्स हाॅस्पिटला होते. तेथे खाट उपलब्ध न झाल्याने श्रीकांतसह भांडणावेळी उपस्थित राजव्यतिरिक्त सर्वजण यशला घाटीत घेऊन गेले. त्यावेळी घाटीतील डॉक्टरांनी यशला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी राजविरुद्ध हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक सचिन इंगोले करीत आहेत.