पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:07 AM2021-02-05T04:07:46+5:302021-02-05T04:07:46+5:30
पैठण : क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा खून झाला. ही घटना शहरातील पेट्रोलपंपाशेजारील रस्त्यावर गुरुवारी उघडकीस आली. योगेश ...
पैठण : क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा खून झाला. ही घटना शहरातील पेट्रोलपंपाशेजारील रस्त्यावर गुरुवारी उघडकीस आली. योगेश रावसाहेब निवारे (वय ३५, रा. नवीन कावसान) असे मयत युवकाचे नाव असून हाणामारीत त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असून याप्रकरणी सोनाजी शिवाजी ढवळे (रा.खळवाडी) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हाणामारीदरम्यान मयत आणि आरोप दोघेही दारूच्या नशेत तर्र होते अशी माहिती पुढे येत आहे.
दोन महिन्यांपूर्वी मयत योगेश निवारे व सोनाजी ढवळे यांचे दारूच्या दुकानात भांडण झाले होते. यावेळी योगेश निवारे यांनी सोनाजी ढवळेच्या कानशिलात लगावल्या होत्या. तेव्हापासून सोनाजीच्या मनात योगेशविषयी राग होता. सोमवारी शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालयात एका विवाहासाठी दोघेही समोरासमोर आल्याने सोनाजीचा राग उफाळून आला. त्याने मंगल कार्यालयाबाहेर येताच योगेशच्या गाडीची चावी काढून घेतली व तो पेट्रोलपंपाच्या पाठीमागे गेला. योगेश चावी घेण्यासाठी त्याच्यापाठोपाठ गेला असता, तेथे दोघांमध्ये हाणामारी झाली. यात योगेश जखमी होऊन खाली पडला. यानंतर सोनाजी तेथून निघून गेला. अज्ञात तरुण म्हणून जखमी अवस्थेतील योगेशला शेखर शिंदे, नामदेव खराद आदींनी घाटी रुग्णालयात दाखल केले. सोमवारी रात्री १२ वाजता उपचारादरम्यान योगेश निवारे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत योगेश यांचे भाऊ गणेश निवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पैठण पोलीस ठाण्यात सोनाजी शिवाजी ढवळे या आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. किशोर पवार यांनी आरोपीस शहरातील खळवाडी येथून अटक केली आहे.
चौकट
असा झाला घटनेचा उलगडा
योगेश निवारे हे सोमवारी लग्नासाठी आशीर्वाद मंगल कार्यालयात जातो, असे सांगून घरातून गेले होते. दोन दिवस झाले, तरीही ते घरी न परतल्याने बेपत्ता असल्याची नोंद करण्यासाठी कुटुंबीय पैठण पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री आले होते. पोनि. किशोर पवार यांनी मिसिंग असलेल्या योगेश निवारेचा फोटो शेखर शिंदे यांना दाखविला. त्यांनी सोमवारी घाटी रुग्णालयात दाखल केलेला तरुण हाच असल्याचे ओळखले. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.
फोटो आहे : योगेश निवारे