मुरुम चोरीप्रकरणी फरार जेसीबी-हायवा मालकाविरुद्ध गुन्ह दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 09:54 PM2019-04-06T21:54:09+5:302019-04-06T21:54:21+5:30
फरार झालेल्या जेसीबी व हायवा मालक-चालकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात मुरुम चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूज महानगर : महसूल विभागाच्या पथकाला चकमा देऊन फरार झालेल्या जेसीबी व हायवा मालक-चालकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात मुरुम चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडगाव कोल्हाटी येथील पाझर तलावातून मोठ्या प्रमाणात मुरुमाची चोरी होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. या वृत्तामुळे खडबडुन जागे झालेल्या महसूल विभागाच्या पथकाने २७ मार्चला वडगाव कोल्हाटी परिसरातील पाझर तलाव तलवाची पाहणीसाठी गेले होते. जेसीबी यंत्राच्या सहाय्याने उत्खनन करुन हायवाद्वारे मुरुम चोरी होत असल्याचे आढळून आले होते.
यावेळी पथकाने पाझर तलावात मिळून आलेल्या जेसीबी (एम.एच.०६, ए.एल.५३४८)मालक नामदेव रामनाथ रोरे, जेसीबी (एम.एच.२०, सी.एल.५१७६) मालक किशोर बनकर व हायवा (एम.एच.२०, ए.टी.०३८२) मालक बद्रीनाथ बनकर (सर्व रा.वडगाव कोल्हाटी) यांच्याविरुध्द पंचनामा केला होता. यावेळी नामदेव रोरे याचा जेसीबी पकडून महसुल विभागाच्या पथकाने हा जेसीबी तहसील कार्यालयात जमा केला होता.
दरम्यान, किशोर बनकर हा जेसीबीसह तर बद्रीनाथ बनकर हा हायवासह पसार झाला होता. फरारी दोघांचा शोध महसूल विभागाकडून सुरु आहे. पंढरपूरचे तलाठी पुनमसिंग डोंगरजाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शनिवारी किशोर बनकर व बद्रीनाथ बनकर या दोघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.