संगीत, ज्ञान आणि साधना हेच तणावमुक्तीचे मार्ग : श्री श्री रविशंकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 01:29 PM2019-02-07T13:29:34+5:302019-02-07T13:42:07+5:30
ज्ञानामुळे जे घडले त्यातून पुढे वाटचाल करता येते आणि साधना, ध्यानामुळे शरीरस्वास्थ्य लाभते.
औरंगाबाद : प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव निर्माण होतो. हा तणाव दूर करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने संगीत, ज्ञान आणि साधना केली पाहिजे. संगीतामुळे मन प्रफुल्लित होते. ज्ञानामुळे जे घडले त्यातून पुढे वाटचाल करता येते आणि साधना, ध्यानामुळे शरीरस्वास्थ्य लाभते. या शरीरस्वास्थ्यामुळे मनुष्याचे आयुष्य तणावमुक्त होते, असे प्रतिपादन आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी बुधवारी येथे केले.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते रविशंकर यांच्या दोनदिवसीय महासत्संगाचे आयोजन बीड बायपास रस्त्यावरील जाबिंदा मैदानावर केले आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजता विठ्ठल नामाच्या गजरात श्री श्री रविशंकर यांनी ईश्वरभक्तीचा मार्ग सांगितला. ते म्हणाले, ईश्वर प्रत्येक क्षणात, प्रत्येक कणात आहे. श्रीकृष्णांनी गीतेत सांगितले आहे, जसा आकाशात वायू आहे, तसाच मी सर्वव्यापी आहे. मला शोधू नका, मी प्रत्येकात आहे. मला शोधण्यासाठी पळू नका. उलट एकाच ठिकाणी थांबून जा. थांबल्यानेच खरी ईश्वरप्राप्ती होते. महाराष्ट्राला संतांची समृद्ध परंपरा आहे, इथे भक्ती आहे आणि जिथे भक्ती असते, तिथेच ईश्वर असतो. ईश्वरभक्ती करणाऱ्यालाच ईश्वराचा आशीर्वाद लाभतो, तेव्हा ईश्वरभक्तीत लीन होण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. आपले मन पाण्यासारखे स्वच्छ आणि प्रवाही असले पाहिजे. नकारात्मक भाव जेव्हा येतात, तेव्हा मन दगडासारखे बनते. मात्र, जेव्हा-जेव्हा मन स्वच्छ, नि:स्वार्थी असते, तेव्हाच ईश्वरप्राप्ती होते. ध्यान, साधना केल्यामुळे शरीराचे स्वास्थ्य सुधारते, बुद्धी तीक्ष्ण होते. त्यामुळे आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होतात, असेही त्यांनी सांगितले.
श्री श्री रविशंकर यांच्या प्रवचनापूर्वी विठ्ठल नामाचा गजर, भजन आणि अभंगांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या मुख्य व्यासपीठाच्या पाठीमागे ५१ फूट उंचीची भव्यदिव्य अशी विठ्ठलाची मूर्ती बनवली होती. या मूर्तीचे पूजन रविशंकर यांच्या हस्ते करण्यात आले.
पैठण, आपेगाव येथून आलेल्या पाचशे महिला, पुरुष, मुले-मुली वारकऱ्यांनी सुभाष महाराज भांडे, ज्ञानेश्वर महाराज पुकलोर, विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पावली, भजन, अभंगांचे सादरीकरण केले. यात ‘अवघे गरजे पंढरपूर; चालला विठू नामाचा गजर’, ‘खेळ मांडियेला वाळवंटी ठायी; नाचती वैष्णव भायी रे’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला’, निवृत्ती- ज्ञानदेव- सोपान, मुक्ताबाई- एकनाथ- नामदेव -तुकाराम या भावगीत- भक्तिगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी महासत्संगाचे आयोजक आर्ट आॅफ लिव्हिंगचे वरिष्ठ शिक्षक अंकुश भालेकर, डॉ. अजित हजारी, संजय भालेकर, श्रीराम बोंद्रे, नंदकिशोर औटी, ऋषिकेश जैस्वाल, प्रीतम गोसावी, शिवशंकर स्वामी, प्रभंजन महतोले, चिराग पाटील, देवेन लड्डा, सचिन लोया आदींची प्रमुख उपस्थिती होती. विश्वनाथ दाशरथे यांनी गणेशवंदना सादर केली. सूत्रसंचालन प्रेषित रुद्रवार यांनी केले.
शेतकऱ्यांनो धीर धरा; परिस्थिती सुधारेल
शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांच्या समस्या लवकरच सुटतील. या अडचणीतून नक्कीच मार्ग निघेल, आम्ही आपल्या सोबत आहोत. जलसंवर्धन करण्यात येत आहे. यातून पाण्याची परिस्थिती बदलेल. यासाठी काही अवधी जाऊ द्यावा लागेल. मात्र, शेतकऱ्यांच्या जीवनात नक्कीच प्रकाश येणार आहे. यासाठी धीर धरण्याची गरज श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केली, तसेच शेतकऱ्यांना रसायनमुक्त शेती करण्याचे आवाहन केले.
‘ओम’च्या गजराने वातावरण प्रफुल्लित
रविशंकर यांनी प्रवचनादरम्यान ध्यान, योगा, प्राणायामाचे महत्त्व भाविकांना पटवून दिले, तसेच प्रचनादरम्यानच दहा मिनिटे ध्यान, योगा आणि प्राणायाम करून घेतला. प्राणायामाच्या शेवटच्या ‘ओम’च्या गजराने वातावरण प्रफुल्लित बनले होते. भाविकांचही उर्त्स्फूतपणे प्रतिसाद मिळत होता. भक्तिरसात सर्व जण तल्लीन झाल्याचे पाहावयास मिळाले.
तक्रार नको, सहकार्य करा; मुलींना शिकवा
समाजात वावरताना प्रत्येकाने सक्रियपणे वागले पाहिजे. घरातील मुलींना शिकवा, दारू, गांजा, ड्रग आदी नशिल्या पदार्थांपासून सावध राहा, इतरांना या पदार्थांच्या सेवनापासून परावृत्त करा, असा संदेशही त्यांनी दिला. याशिवाय व्यवस्था बिघडलेली असल्यास त्याविषयी तक्रार करण्याऐवजी ती सोडविण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहनही रविशंकर यांनी केले.
भाविकांची प्रचंड गर्दी
श्री श्री रविशंकर यांच्या विठ्ठला महासत्संगाला हजारो भाविकांची गर्दी जमली होती. खुर्च्यांवर भाविकांना जागा अपुरी पडल्यामुळे अनेकांनी मिळेल त्याठिकाणी रिकाम्या जाग्यांवर बसून सत्संग ऐकण्यात धन्यता मानली. मुख्य व्यासपीठाच्या मधोमध लाल गालिचा टाकण्यात आला होता. रविशंकर यांनी या गालिच्यावरून भाविकांना दर्शन देताच एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी त्यांनी भाविकांवर गुलाबांच्या पाकळ्यांची उधळणही केली. गुलाबाच्या पाकळ्या वेचण्यासाठी यावेळी भाविकांनी गर्दी केली होती.