विजयानंतर रात्री मुस्लिम, दलित वसाहतींमध्ये जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:40 AM2019-05-24T00:40:02+5:302019-05-24T00:41:32+5:30
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १९८० मध्ये काँग्रेसचे काझी सलीम निवडून आले होते. त्यानंतर मागील ३९ वर्षांमध्ये एकदाही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री एमआयएम-बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील निवडून येताच मुस्लिम बांधवांनी चक्क रमजान ईदच साजरी केली.
औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १९८० मध्ये काँग्रेसचे काझी सलीम निवडून आले होते. त्यानंतर मागील ३९ वर्षांमध्ये एकदाही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री एमआयएम-बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील निवडून येताच मुस्लिम बांधवांनी चक्क रमजान ईदच साजरी केली. या आनंदोत्सवाला दलित बांधवांनीही तेवढ्याच तोलामोलाची साथ दिली. रात्री ‘तरावीह’च्या नमाजनंतर मिरवणुका, फटाक्यांची आतषबाजी करीत जिकडे तिकडे एकच जल्लोष साजरा करण्यात येत होता.
२३ एप्रिल रोजी औरंगाबाद लोकसभेसाठी मतदान घेण्यात आले होते. मागील एक महिन्यापासून बहुजन वंचित आघाडी, एमआयएम कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक २३ मेच्या निकालाची चातकाप्रमाणे आतुरनेने वाट पाहत होते. अखेर गुरुवारी तो दिवस उगवला. सकाळी फजरच्या नमाजनंतर हजारो कार्यकर्ते मेल्ट्रॉन कंपनीसमोर ठाण मांडून बसले होते. याच ठिकाणी दिवसभर त्यांनी जोहर, असर आणि मगरीबची नमाज अदा केली. तत्पूर्वी इफ्तारही येथेच केला. रात्री इम्तियाज जलील यांच्या निवडीची घोषणा होताच सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते. अनेक उत्साही कार्यकर्त्यांनी इफ्तारपूर्वी आणि नंतरच फटाक्यांची आतषबाजी केली. सध्या रमजान महिना सुरू आहे. रात्री उशिरा ‘तरावीह’ची नमाज झाल्यानंतर मिलकॉर्नर, बुढीलेन, टाऊन हॉल, घाटी, लोटाकारंजा, शहाबाजार, रोशनगेट, जिन्सी, किराडपुरा, सिद्धार्थनगर, टी. व्ही. सेंटर आदी भागांत जल्लोष साजरा करण्यात येत होता. हिरव्या, निळ्या गुलालाची मुक्तपणे उधळण सुरू होती. कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक आणि विशेषत: तरुणाईला हा विजय गगनात मावेनासा झाला होता. कौन आया कौन आया...शेर आया शेर आया... ही लोकप्रिय घोषणाही यावेळी देण्यात येत होती.
डीजे लावून आनंदोत्सव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भडकलगेट येथील पुतळ्यासमोर डीजे लावूनही कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. रात्री उशिरापर्यंत मुस्लिमबहुल भागातील सर्वच रस्ते गर्दीने तुडुंब भरले होते. जिकडे तिकडे हिरव्या गुलालाची उधळण सुरू होती.
------------