औरंगाबादेत मुस्लिम महिलांचा उद्या महामोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:02 AM2018-03-22T00:02:36+5:302018-03-22T00:04:53+5:30
मुस्लिम बांधवांच्या ‘शरियत’मध्ये होत असलेल्या हस्तक्षेपाच्या विरोधात शुक्रवार, दि.२३ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयावर महिलांचा महामोर्चा काढण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मुस्लिम बांधवांच्या ‘शरियत’मध्ये होत असलेल्या हस्तक्षेपाच्या विरोधात शुक्रवार, दि.२३ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयावर महिलांचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सूचनेनुसार हा मोर्चा काढण्यात येत आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत यशस्वी मोर्चांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारच्या मोर्चात विविध संस्था, संघटनांसह सर्वसामान्य महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
तीन तलाक विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार असून, बुधवारी संयोजकांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मोर्चाच्या समन्वयक फहीम-उन्न-निसाबेगम यांनी सांगितले की, शुक्रवारच्या विशेष नमाजनंतर मोर्चाला सुरुवात होणार आहे. दुपारी ३ वाजता आमखास मैदानाहून मोर्चाला सुरुवात होईल. विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चाचा समारोप करण्यात येणार आहे. मोर्चा काढण्यासाठी मागील काही दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात येत आहे. वॉर्डनिहाय बैठका, प्रत्येक घरी जाऊन महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे.
फहीम-उन्-निसाबेगम यांनी नमूद केले की, तीन तलाकला समोर ठेवून शरियतमध्ये हस्तक्षेप होत आहे. मुस्लिम समाज आणि महिलांना हे कदापि मान्य नाही. मुस्लिम महिलांबद्दल केंद्र शासनाला एवढी आपुलकी असेल, तर त्यांनी शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यावे. या देशात तीन तलाकशिवायही अनेक गंभीर समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. बेरोजगारी, दारू यासंदर्भात ठोस पावले उचलावेत.