मुथुट फायनान्सवर दरोडा टाकणारी टोळी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:43 AM2017-08-25T00:43:43+5:302017-08-25T00:43:43+5:30
दूध डेअरी चौकातील मुथुट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर भरदिवसा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाºया टोळीला हैदराबाद पोलिसांनी अटक केली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दूध डेअरी चौकातील मुथुट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर भरदिवसा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाºया टोळीला हैदराबाद पोलिसांनी अटक केली. हे आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, त्यांना लवकरच औरंगाबाद पोलिसांकडून अटक केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी २४ आॅगस्ट रोजी पत्रकारांना दिली.
१४ मे २०१६ रोजी सकाळी ९.४० वाजेच्या सुमारास पोलिसांच्या वेशात पाच ते सहा दरोडेखोरांनी या फायनान्स कंपनीवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी कार्यालयीन कर्मचाºयांनी प्रसंगावधान राखून अलार्म वाजविल्याने घाबरलेले दरोडेखोर वाहनांनी पळून गेले होते. तेव्हापासून पोलीस यंत्रणा दरोडेखोरांच्या मागावर होती. दरोडेखोरांनी गुन्ह्यात वापरलेली कार चोरीची निघाली होती. आंतरराज्यीय दरोडेखोरांची ही टोळी असल्याने ते सारखे एका राज्यातून दुसºया राज्यात प्रवास करीत. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी येथे रुजू झाल्यानंतर या दरोड्याच्या तपासाची प्रगती जाणून घेऊन हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी अधिकाºयांना मार्गदर्शन केले होते. पोलिसांचा तपास सुरू असतानाच हैदराबाद पोलिसांनी पकडलेल्या दरोडेखोरांच्या टोळीने औरंगाबादेतील मुथुट फायनान्सवर दरोडा टाकल्याची कबुली दिली. याबाबतची आयुक्तांना नुकतीच माहिती मिळाली आहे.
याविषयी आयुक्त यादव म्हणाले की, सध्या ही टोळी हैदराबाद पोलिसांच्या कोठडीत आहे. त्यांची रिमांड संपल्यानंतर औरंगाबाद पोलीस आरोपींना ताब्यात घेऊन औरंगाबादेत आणतील.