Abdul Sattar: माझी दोघांनाही सूचना, शिंदेंच्या मंत्र्यांनी सत्तारांना दिला नववर्षाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 01:02 PM2023-01-01T13:02:25+5:302023-01-01T13:13:27+5:30
यावेळी, भुमरे यांनी औरंगाबाद शहराच्या विकासाबद्दलही भूमिका मांडली.
औरंगाबाद - मंत्रिपद न मिळालेला माझ्याच पक्षातील नेता माझ्याविरोधात कट करत असून, याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे लवकरच तक्रार करणार असल्याचा खळबळजनक आरोप कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. या प्रकारामुळे शिंदे गटात सुरु असलेली अंतर्गत कुरघोडी चव्हाट्यावर आली आहे. याप्रकरणी आता शिंदे गटातील ज्येष्ठ नेते आणि औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी मत व्यक्त केलं आहे. तसेच, अब्दुल सत्तार यांना नवीन वर्षाच्या पहिल्यादिवशी सल्लाही देऊ केला. यावेळी, भुमरे यांनी औरंगाबाद शहराच्या विकासाबद्दलही भूमिका मांडली.
राज्यात झालेला टीईटी घोटाळा, सिल्लोड महोत्सवासाठी अधिकाऱ्यांना दिलेले टार्गेट, गायरान जमिनीचे प्रकरण यावरून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी चांगलेच घेरले होते. प्रसारमाध्यमांनीही याबाबत बातम्या दिल्या होत्या. मोठा गदारोळ झाल्यानंतर याबाबत अधिवेशनात कृषिमंत्री सत्तार यांनी आपली बाजू मांडली. तरीही सभागृहात त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चर्चा अद्याप राज्यभर सुरूच आहे. त्यावरुन, अखेर सत्तार यांनी मौन सोडलं असून आपल्याच पक्षातील नेत्याकडे बोट दाखवलं आहे. त्यामुळे, शिंदे गटातील धुसफूस समोर आली. यावर आता, मंत्री संदीपान भुमरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय बोलायचं, काय नाही हे आपण आपल्या घरात बसून म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत, माझ्यासोबत चर्चा करुन ठरवलं पाहिजे. माध्यमांसमोर असं बोललं नाही पाहिजे ही माझी दोघांनाही सूचना आहे, असे म्हणत संदीपान भुमरे यांनी अब्दुल सत्तार यांच्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, सत्तारांचा रोक कोणाकडे आहे हे त्यांना माहिती, मला सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले.
शहराच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मिटेल
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असून शहराला लवकरात लवकर कसे पाणी मिळेल हे पाहावे लागणार आहे. त्यासोबतच, स्वच्छता आणि रस्त्यांकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातून शहरासाठी मोठा निधी आणण्याचा आमचा प्रयत्न असून पाणी योजना त्यांनी मंजूर केली आहे. त्यामुळे, लवकरच शहराला पाणी मिळेल, असे मंत्री संदीपान भुमरे यांनी म्हटले.