मुंबई,पुण्यातील माझे बंगले कल्याण काळे यांनी शोधावेत, त्यांच्या नावावर करून देतो: हरिभाऊ बागडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 12:20 PM2023-06-28T12:20:40+5:302023-06-28T12:21:38+5:30
आमदार हरिभाऊ बागडे यांचे भाजपच्या व्यापारी संमेलनात करमाड येथे जाहीर आव्हान
करमाड : मुंबई, पुण्यात माझे जे काय बंगले किंवा इतर मालमत्ता असेल, ती डॉ. कल्याण काळे यांनी शोधून काढावी, ती सर्व मालमत्ता मी काळे यांच्या नावे करण्यास तयार आहे, असे जाहीर आव्हान आ. हरिभाऊ बागडे यांनी कल्याण काळे यांना मंगळवारी करमाड येथे भाजपच्या व्यापारी संमेलनात दिले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय औताडे, बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, तालुकाध्यक्ष राम शेळके, संचालक दत्ता उकर्डे, भागचंद ठोंबरे, नागरिक व व्यापारी उपस्थित होते. कन्नड येथे एका मेळाव्यात कल्याण काळे यांनी आरोप केला होता की, हरिभाऊ बागडे यांचे मुंबईत आणि पुण्यात बंगले आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर शहरातही त्यांचे चार बंगले आहेत. संभाजीराजे साखर कारखाना त्यांचा आहे.
त्या आरोपांना उत्तर देताना बागडे म्हणाले की, आमदारकीचे मानधन धरून मला महिन्याला अडीच लाखांचे उत्पन्न मिळते. मुंबईत आमदारांना जसा फ्लॅट मिळतो, तसा मला मिळाला होता. तो फ्लॅट पाच-सहा वर्षांपूर्वीच मी विकून छत्रपती संभाजीनगर शहरात एक बंगलावजा कॉम्प्लेक्स बांधले आहे, साखर कारखाना माझा नव्हे तर ज्यांनी शेअर्स भरले, त्यांचा आहे. मी केवळ एक सभासद आहे. जमीन माझी वडिलोपार्जित आहे, तेवढीच मालमत्ता आजही माझ्या नावावर आहे. कल्याण काळे म्हणाले होते की, माझे बागडेंसारखे नाही. मी अजूनही माझ्या वडिलांनीच मला आमदार होण्यापूर्वी बांधून दिलेल्या बंगल्यात राहतो. पण काळे यांचा हा बंगला त्यांच्या वडिलांनी ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन असताना बांधून दिला होता, हेही काळेंनी लक्षात घ्यावे, असा टोला बागडे यांनी लगावला.
वेळी रामकिसन भोसले, रामेश्वर सोळुंके, सय्यद कदीर, रवीकुमार कुलकर्णी, सुदाम उकर्डे, सरसाबाई वाघ, सजनराव मते, दामोदर नवपुते आदी उपस्थित होते. संचालन दत्ता उकर्डे यांनी केले.