‘माझा पर्यावरणस्नेही परिसर, माझे एक लाडके वृक्ष’
By राम शिनगारे | Published: July 5, 2024 09:42 PM2024-07-05T21:42:36+5:302024-07-05T21:42:45+5:30
इटखेडा परिसरात वृक्षारोपण मोहीम : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर : इटखेडा परिसरातील नाथपुरम भागातील रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाच्या मोहिमेला शुक्रवारी (दि.५) सकाळी सुरुवात झाली. या मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिकाने ‘माझा पर्यावरणस्नेही परिसर, माझे एक लाडके वृक्ष’ यानुसार लावलेल्या प्रत्येक वृक्षाची जोपासना करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभिनव उपक्रमाची सुरुवात माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते करण्यात आली.
‘लोकसंवाद फाउंडेशन’तर्फे इटखेडा परिसरातील नाथपुरममध्ये महानगरपालिका प्रशासनाच्या मदतीने परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड करण्याची माेहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लोकसंवादचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे, सचिव डॉ. गणेश मोहिते, डॉ. फुलचंद सलामपुरे, शासकीय अधिकारी अशोक सिरसे, रामचंद्र कर्डिले, मनपाचे अधिकारी किशोर शिंदे, अनिता मंत्री, मंदा बनकर, बांधकाम व्यावसायिक सुदाम मुळे पाटील, शिवाजीराव एरंडे आदींची उपस्थिती होती. यावेळी घोडेले म्हणाले, सध्या सगळीकडेच लाडकी शब्दाचा बोलबाला सुरू आहे.
त्यामुळे या परिसरातील पर्यावरणस्नेही नागरिकांनी वृक्ष लागवड करत वृक्ष जोपासण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘माझा पर्यावरणस्नेही परिसर, माझे एक लाडके वृक्ष’ असा उपक्रम सुरू करून प्रत्येक वृक्षाचे दायित्व प्रत्येकाने स्वीकारले पाहिजे, असे आवाहन केले. त्यास उपस्थितांनी प्रतिसाद देत लावलेले प्रत्येक वृक्ष जगविण्यासाठी ‘माझे एक लाडके वृक्ष’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. यावेळी शासकीय अधिकारी अशोक सिरसे यांनी २० वृक्षांना वैयक्तिक खर्चातून सुरक्षा जाळी देण्याची घोषणा केली. तर डॉ. राजेश करपे यांनी हा परिसराला ग्रीन करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. राम चव्हाण, डॉ. पुरुषोत्तम देशमुख, भगवान गायकवाड, डॉ. गजानन जाधव, बाबासाहेब खडके, रवी जगदाळे, अमोल औटे, रामचंद्र कर्डिले, गौतम सोनवणे, विनोद राऊत, संजय काळवीट, घनश्याम भामरे आदींची उपस्थिती होती.