‘माझा लाडू पांडुरंगाला’; वारकऱ्यांसाठी बनविणार ५१ हजार लाडू, १७ वर्षांपासून अनोखी भक्ती
By संतोष हिरेमठ | Published: July 11, 2024 04:10 PM2024-07-11T16:10:23+5:302024-07-11T16:11:01+5:30
हे लाडू आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे वारकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर : अहो, ‘माझा एक तरी लाडू माझ्या पांडुरंगाला’ असे म्हणत छत्रपती संभाजीनगरातील अनेक महिला एकत्र येऊन १४ जुलै रोजी अवघ्या ३ तासांत गूळ-शेंगदाण्याचे ५१ हजार लाडू तयार करणार आहेत. हे लाडू आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे वारकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहेत.
वारकरी परिवारातर्फे गेल्या १६ वर्षांपासून आषाढी एकादशीनिमित्त ‘माझा एक तरी लाडू माझ्या पांडुरंगाला’ हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदा याचे १७वे वर्ष आहे. रविवारी बालाजीनगर येथील श्री बालाजी मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता ५१ हजार लाडू बनविण्यास सुरुवात होईल. जवळपास ३ तासांत हे लाडू तयार होतील. यात किमान ५०० ते एक हजार महिला, पुरुष सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. तयार करण्यात आलेले लाडू १७ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे वारकऱ्यांना वाटप करण्यात येतील. लाडूसह साबुदाणा खिचडी, भगर, आमटीचा महाप्रसादही दिला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी डाॅ. भैरव कुलकर्णी, लक्ष्मीकांत सुर्वे, जगन्नाथ गीते, अर्जुन पवार, बाळू घुगे, योगेश कोडगिरे, प्रदीप राठोड, मनोज सुर्वे आदी प्रयत्नशील आहेत.
तयारी सुरू
लाडू बनविण्यासाठी आवश्यक असलेली तयारी सध्या सुरू आहे. शेंगदाणे भाजून घेणे, गूळ बारीक करणे, अशी कामे केली जात आहेत. जवळपास ३ तासांत ही ५१ हजार लाडू तयार होतील,
-मनोज सुर्वे, वारकरी